गोवा खबर : भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंटच्या 17 व्या आवृत्तीचा आज मंगोलियातील उलानबटार येथे समारोप झाला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासह ऑपरेशनल लॉजिस्टिक्स अँड स्ट्रॅटेजिक मूव्हमेंटचे महासंचालक लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह या समारोप समारंभाला उपस्थित होते.
अरुणाचल स्काउट्स बटालियनमधील 45 जणांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या पथकाने दोन आठवड्यांच्या या सरावात सक्रिय सहभाग घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार निम -शहरी आणि पर्वतीय प्रदेशात अर्ध-पारंपारिक परिस्थितीत संयुक्त कृतीदल म्हणून काम करताना भारतीय लष्कर आणि मंगोलियन सशस्त्र दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा संयुक्त प्रशिक्षणाचा उद्देश होता.
समारोप समारंभात बोलताना, संरक्षण सचिवांनी “नोमॅडिक एलिफंट” या सरावातली भारतीय सैनिकांची निपुणता , समर्पण आणि वर्तनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, हा सराव भारत आणि मंगोलिया यांच्यातील मैत्री, परस्पर विश्वास आणि सामायिक सांस्कृतिक संबंधांच्या चिरस्थायी बंधाचा दाखला आहे. हा सराव अर्थपूर्ण लष्करी सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेप्रति भारताची अढळ वचनबद्धता दर्शवतो. ते म्हणाले की, अशा संयुक्त उपक्रमांमध्ये भारतीय लष्कराचे योगदान केवळ परिचालन सज्जता वाढवत नाही तर जागतिक शांतता राखण्याच्या प्रयत्नांमध्ये एक जबाबदार हितधारक म्हणून भारताची भूमिका देखील बळकट करते.
संरक्षण सचिव उद्या याच ठिकाणी बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव “खान क्वेस्ट 2025” च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये भारतीय लष्कराची तुकडी देखील सहभागी होणार आहे. खान क्वेस्ट 2025 हा सराव 14 ते 28 जून 2025 दरम्यान आयोजित केला जाणार आहे.
नोमॅडिक एलिफंट आणि खान क्वेस्ट हे सराव भारताच्या विस्तारणाऱ्या संरक्षण मुत्सद्देगिरीतील एक महत्त्वाचा टप्पा असून मंगोलियासोबतच्या भागीदारीचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करतात.