गोवा खबर:भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी ढेंकनाल येथी आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) या संस्थेला भेट दिली. या भेटीत त्यांनी तिथे सुरू असलेल्या नूतनीकरण कामांचा आढावा घेतला तसेच संस्थेच्या भविष्यातील विकास योजनांवर चर्चा केली.
भेटीदरम्यान, जाजू यांनी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, शैक्षणिक इमारत, ऑडिओ-व्हिडिओ सुविधा आणि प्रशासकीय इमारत यासह भौतिक पायाभूत सुविधांची पाहणी केली. त्यांनी प्रादेशिक संचालक प्रा. डॉ. आनंद प्रधान यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये संस्थेची सध्याची स्थिती, शैक्षणिक उपक्रम, पायाभूत गरजा आणि विस्तारासाठीचे धोरणात्मक आराखडे यांचा समावेश होता.
प्रा. प्रधान यांनी सचिवांना या परिसरासमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधींबाबत माहिती दिली. त्यात प्रामुख्याने शैक्षणिक कार्यक्रम वृद्धिंगत करणे आणि विद्यार्थ्यांची क्षमता वाढवणे यावर भर दिला. चर्चेदरम्यान पदव्युत्तर (एमए) अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आणि उद्योग-विद्यापीठ सहयोग मजबूत करण्यावरही चर्चा झाली.
संपादनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, जाजू यांनी या परिसरातील सांघिक प्रयत्नांचे कौतुक केले आणि आयआयएमसी ढेंकनालला माध्यम आणि संवाद शिक्षणाच्या क्षेत्रात पूर्व भारतातील एक अग्रगण्य उत्कृष्टता केंद्र बनवण्यासाठी मंत्रालयाच्या पूर्ण पाठबळाची हमी दिली.
ही भेट प्रादेशिक केंद्रांना बळकट करण्याच्या आणि देशभर दर्जेदार माध्यम शिक्षण सर्वसमावेशक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या मंत्रालयाच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.