गोवा खबर : गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलताना,पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज अनेक प्रमुख पर्यटन पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मिळालेल्या मंजुरीनंतर माध्यमांशी संवाद साधला. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने पर्वरीमधील १२०.९७ कोटी रुपयांच्या टाउन स्क्वेअर प्रकल्पाचा समावेश आहे.
पर्वरी खाडीचे सौंदर्यीकरण आणि फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा विकास, या दोन्ही प्रकल्पांची घोषणा यावेळी करण्यात आली. या प्रकल्पांचा उद्देश गोव्याचा सांस्कृतिक पर्यटन अनुभव विकसित करणे आहे. पत्रकार परिषदेला पर्यटन संचालक केदार नाईक; जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर; आणि जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गेविन डायस उपस्थित होते
पर्वरीमधील टाउन स्क्वेअरची संकल्पना ही देशातील, अशा प्रकारचा हा पहिला विकास प्रकल्प म्हणून केली जात आहे. ही एक वारसा-संबंधित जागा आहे, जी आर्थिक विकासाला देखील चालना देईल. हा प्रकल्प ११,००० चौरस मीटरमध्ये पसरलेला असून वर्षभर चालणारा सार्वजनिक कार्यक्रम मंच म्हणून तो तयार केला जात आहे.
हा प्रकल्प स्थानिक कारागिरांना आश्रय देणारा आणि रोजगार व सांस्कृतिक सहभागाच्या संधी निर्माण करणारे एक समुदाय केंद्र म्हणून काम करेल. या प्रकल्पात मार्केट कोर्ट, वेलकम कोर्ट, फाउंटन कोर्ट, मुव्ही कोर्ट, हेरिटेज कोर्ट, अशोक स्तंभ आणि क्लॉक टॉवर यासारख्या सुविधा असतील, ज्याठिकाणी लोक एकत्र येतील व विविध उपक्रम एकाच ठिकाणी होतील. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १२०.९७ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारकडून ९०.७४ कोटी आणि राज्य सरकारकडून ३५.३२ कोटी रुपये निधी देण्यात येईल. मार्च २०२६ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करताना, मंत्री खंवटे म्हणाले, की टाउन स्क्वेअर हा प्रकल्प कलाकार आणि सांस्कृतिक उद्योजकांना नवीन मार्ग प्रदान करेल व त्याचबरोबर गोव्याच्या वारशात रुजलेली अशी आधुनिक जागा देईल. त्यांनी सांगितले, की हा प्रकल्प पर्वरी परिसराची शोभा वाढवेल व पर्यटकांना आकर्षित करेल तसेच सर्जनशील अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
खंवटे यांनी स्वदेश दर्शन २.० योजनेअंतर्गत – पर्वरी ते हरवळे पर्यंतच्या ग्रामीण सर्किट या प्रकल्पाला देखील मंजुरी देण्याची घोषणा केली. हा प्रकल्प तोरडा खाडी, मालीम जेट्टी, विरलोसा आणि पोंबुर्फा झरा यांचा समावेश करून हरवळे पर्यंत विस्तारित खाडीचा अनुभव देईल. आध्यात्मिक सर्किटचा एक भाग म्हणून, गोमंत सरिता पूजन नार्वे परिसरात केले जाईल, जे गोव्याच्या पुनरुत्पादीत पर्यटन मॉडेल अंतर्गत एकादशा तीर्थ उपक्रमाशी जोडले जाईल.
स्वदेश दर्शन २.० योजनेच्या किनारपट्टी घटकाशी सुसंगत असा, कोलवा येथे देखील पर्यटकांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी सुधारित सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणी पुनर्विकास केला जाईल.
माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त श्री खंवटे यांनी सांगितले, की धबधबे किंवा इतर मान्सून-संबंधित पर्यटन स्थळांना भेट देण्यावर कोणतीही बंदी नाही. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तसेच या ठिकाणांवर सुरक्षितपणे आणि सोप्या पद्धतीने प्रवेश मिळावा यासाठी वन खाते व गोवा वन विकास महामंडळ यांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असे त्यांनी आश्वासन दिले.
मंत्री खंवटे यांनी गोव्याच्या पर्यटन क्षेत्राबद्दल जबाबदारीने संवाद साधण्याच्या गरजेवरही भर दिला. तसेच भागधारकांना राज्याच्या सकारात्मक गतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “मान्सून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी” नवीन प्रयत्नांवर प्रकाश टाकताना, खंवटे म्हणाले, की राज्य सक्रियपणे एक नवीन पर्यटन कथा घडवित आहे, जी पर्यटकांना वर्षभर गोव्याचा अनुभव घेण्यास प्रोत्साहित करेल.
गेल्या तीन वर्षांत, समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोव्याच्या पर्यटन कथेची पुनर्परिभाषा घडविण्यासाठी केंद्रित प्रयत्न केले गेले आहेत. दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करणारे आणि त्यांना राज्याचा अधिक समग्र अनुभव देणारे, नवीन क्षेत्र सादर करणे हे याचे उद्दिष्ट आहे. हरित-पर्यटन आणि साहसी पर्यटनापासून ते एमआयसीई आणि वेलनेसपर्यंत, गोवा सक्रियपणे अशा पायाभूत सुविधा विकसित करत आहे, ज्या राज्याने यापूर्वी कधीही पाहिल्या नाहीत. यात पर्यटकांना किनारपट्टीच्या पलीकडे असलेले भूदृश्य, सांस्कृतिक समृद्धता आणि उदयोन्मुख अनुभव घेण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
केंद्रीय मंत्रालयाने राज्याचे सुमारे ४०० कोटी रुपये किमतीचे पर्यटन प्रकल्प मंजूर केले आहेत. मंत्री खंवटे यांनी पर्यटकांना गोव्यातील वाळू आणि समुद्रापलीकडील पर्यटनाचा अनुभव घेण्याचे महत्त्व पुन्हा सांगितले. ज्यामुळे राज्याची संस्कृती, वारसा आणि अंतर्गत स्थळांबद्दल सखोल माहिती घेण्यास प्रोत्साहन मिळते.
सध्याच्या आव्हानांवर बोलताना ते म्हणाले, की “जगाला गोवा आणि गोव्यातील लोकांबद्दल माहिती आहे. ‘आमका भिवपाची गरज ना’. पण हो, आपल्याला काही सुधारणा करण्याची आवश्यकता नक्कीच आहे.” टॅक्सी ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी व त्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी, त्याचबरोबर गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात सकारात्मक गती राखण्यासाठी प्रयत्नांना पाठिंबा देण्यास, माध्यमांना यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले आहे.