गोवा खबर

2025 मध्ये सरासरीपेक्षा जास्त नैऋत्य मोसमी पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Published

on

Spread the love

गोवा खबर : भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील भारतीय हवामान विभागाने 2025 साठी नैऋत्य मोसमी (जून ते सप्टेंबर) पावसाचा तसेच प्रत्येक महिन्यातील पावसाचा व तापमानाचा सुधारित अंदाज प्रकाशित केला आहे. या अंदाजानुसार, देशभरात मिळून दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) 106 टक्के मोसमी पाऊस पडेल. यामध्ये 4 टक्के कमीअधिक होण्याची शक्यता आहे. मान्सून हंगामातील सरासरीपेक्षा जास्त पावसाचीच शक्यता दर्शविणारे हे प्रमाण आहे. 

साधारणपणे मध्य भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर वायव्य भारतात सरासरीइतका (एलपीएच्या 92 ते 108 टक्के) पाऊस पडेल. ईशान्य भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी (एलपीएच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी) पावसाची शक्यता आहे. भारतातील पावसावर शेती अवलंबून असणाऱ्या मोसमी पावसाच्या क्षेत्रातदेखील सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून हे खरीपातील शेतीसाठी फायदेशीर आहे.

जून ते सप्टेंबर 2025 या काळात देशाच्या बहुतांश भागात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. मात्र वायव्य आणि पूर्व भारतात तसेच ईशान्य भारतातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

विशेषत्वाने जून 2025 मध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त (एलपीएच्या 108 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडेल. बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असला तरी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात आणि वायव्य व ईशान्य भारतातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग शेतीच्या नियोजनासाठी, जलस्रोतांच्या व्यवस्थापनात आणि आपत्ती व्यवस्थापन सज्जतेत मदत व्हावी यादृष्टीने हवामानाच्या अंदाजावर सातत्याने लक्ष ठेवून त्यात सुधारणा करेल. यापुढील हवामानविषयक अंदाज व सविस्तर अहवाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Trending

Exit mobile version