गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात सार्वजनिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. मनोहर जोशी (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. या सोहळ्यात राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातल्या डॉ. विलास गजाननराव डांगरे (वैद्यकीय सेवा), अश्विनी भिडे देशपांडे (कला), अच्युत रामचंद्र पालव (कला), अशोक लक्ष्मण सराफ (कला) आणि सुभाष खेतुलाल शर्मा (इतर-कृषी) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ. मनोहर जोशी
डॉ. मनोहर जोशी यांनी 55 वर्षांहून अधिक काळ सामाजिक, राजकीय, व्यवसाय आणि साहित्यिक क्षेत्रात योगदान दिले. डॉ. जोशी हे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार होते. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री असतानाच्या कार्यकाळात, त्यांनी संघर्ष करणाऱ्या उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यावर लक्ष केंद्रित केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदीय कामकाज अधिक समावेशक आणि कार्यक्षम केले. संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि संसद भवनात वीर सावरकरांचे चित्र बसवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी 45 देशांचे अभ्यास दौरे केले आणि चांगल्या पद्धती आणि तंत्रज्ञान भारतात आणण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटवरील प्रेमामुळे त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित 15 पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्याबद्दल मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये 17 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
डॉ. जोशी यांना त्यांच्या योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट. ही मानद पदवी प्रदान केली. डॉ. जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले.
डॉ. विलास गजाननराव डांगरे
चांदुरबाजार नावाच्या एका छोट्या गावात 4 नोव्हेंबर 1954 रोजी डॉ. डांगरे यांचा जन्म झाला. नागपूर होमिओपॅथिक महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्या काळात आधुनिक वैद्यकीय शिक्षणाविषयी खूपच आकर्षण होते, परंतु सुरुवातीपासूनच सेवाभावी वृत्तीची असलेल्या डांगरे यांनी वेगळा मार्ग निवडला आणि होमिओपॅथीची कास धरली. त्यांनी 1976 मध्ये होमिओपॅथिक शिक्षण पूर्ण केले. डॉ. प्रभाकर भोयर यांच्यासोबत त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांनी काही काळ प्रॅक्टिस केली आणि नंतर सुरेंद्र नगर येथे स्वतःचे क्लिनिक उघडले.
आपला पेशा सांभाळत, डॉ. डांगरे यांनी समाजसेवेतही स्वतःला झोकून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. त्यांनी अनेक वर्षे संघाचे क्षेत्र प्रमुख म्हणून काम केले आणि सध्या ते ‘तरुण भारत’ हे वृत्तपत्र चालवणाऱ्या श्री नरकेसरी प्रकाशनाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना राजकारणात येण्याविषयी विचारणा झाल्या, परंतु विचलित न होता त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि सेवाकार्यावरच लक्ष केंद्रित केले. त्यांनी त्यांच्या नागपूर क्लिनिकमध्ये अनेक तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
अश्विनी भिडे देशपांडे
अश्विनी भिडे देशपांडे या प्रसिद्ध “जयपूर-अत्रौली” गायन परंपरेतील हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत.
त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1960 रोजी संगीताची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्या वयाच्या सोळाव्या वर्षी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ झाल्या. आकाशवाणी संगीत स्पर्धेत त्यांनी राष्ट्रपतींचे सुवर्णपदक पटकावले. भाभा अणु संशोधन केंद्र/ मुंबई विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट (पीएचडी) पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगीताला आपले पहिले प्रेम आणि करिअर म्हणून निवडले आहे.
अश्विनी भिडे देशपांडे या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ‘टॉप ग्रेड’ कलाकार आहेत आणि आकाशवाणी-दूरदर्शनच्या अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत. त्यांनी विविध शाळा, महाविद्यालये आणि संगीत परिषदांमध्ये नियमितपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर व्याख्याने आणि प्रात्यक्षिके देऊन देशातील आणि परदेशातील सामान्य श्रोत्यांची सांगीतिक जाण वृद्धिंगत करण्यात योगदान दिले आहे. शिक्षिका म्हणून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले असून अनेक यशस्वी संगीत कलाकार त्यांनी घडवले आहेत.
देशपांडे यांना भारतीय शास्त्रीय गायन संगीतातील योगदानाबद्दल अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय कुमार गंधर्व सन्मान 2005, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला हिंदुस्थानी गायिका आहेत. पंडित जसराज यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त पंडित जसराज गौरव पुरस्कार 2005, दूरदर्शन सह्याद्रीचा ‘संगीत रत्न’ पुरस्कार 2010, पहिला गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार 2011, महाराष्ट्र शासनाचा ‘सांस्कृतिक’ पुरस्कार 2011, बंगळुरू किडनी फाऊंडेशनचा ‘पंडित मल्लिकार्जुन मन्सूर पुरस्कार’ 2013, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2014 आणि मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय कालिदास सन्मान 2016 अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठाने 2020 मध्ये डी.लिट (मानद) प्रदान केली आहे.
अच्युत रामचंद्र पालव
अच्युत रामचंद्र पालव प्रसिद्ध सुलेखनकार असून भारतीय लिपींमध्ये, विशेषतः देवनागरी आणि मोडीमध्ये त्यांच्या सुलेखनासाठी ते ओळखले जातात. ते पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे संस्थापक आहेत आणि पारंपरिक आणि आधुनिक अनुप्रयोगांमध्ये भारतीय लिपींच्या बहुमुखी प्रतिभेचे प्रदर्शन आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
पालव यांचे आतापर्यंत सुमारे 14 लेखनसाहित्य प्रकाशित झाले असून यात डायरी, पुस्तके, माहितीपूर्ण पुस्तिका, पारंपारिक ‘कित्ता ‘ , त्यांचे नवीनतम संकलन ‘अक्षरभारती’,यांचा समावेश आहे. ‘द मॅग्निफिसेंट स्क्रिप्ट्स ऑफ इंडिया’ भारतातील प्राचीन आणि प्रचलित लिपींना प्रकाशझोतात आणते. त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत आणि भारत आणि परदेशातील अनेक प्रतिष्ठित गॅलरी, संस्था आणि ठिकाणी कॅलिग्राफीची प्रात्यक्षिके दिली आहेत.
पालव यांना 1 राष्ट्रीय पुरस्कार (त्यांच्या अक्षरानुभव या पुस्तकासाठी), 5 राज्य पुरस्कार, 3 कम्युनिकेशन आर्ट गिल्ड पुरस्कार, इंडियन एक्सप्रेस ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सचा एक पुरस्कार प्राप्त झाला आहे. आयडीसी (आयआयटी बॉम्बे) आणि बनारस हिंदू विद्यापीठाकडून जीवनगौरव पुरस्कार 2023 ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पालव यांना दक्षिण कोरियामध्ये आयोजित जागतिक सुलेखन स्पर्धेत ‘बेस्ट ऑफ बेस्ट’ पुरस्कार मिळाला आहे
अशोक लक्ष्मण सराफ
अशोक सराफ हे एक दिग्गज भारतीय अभिनेते, विनोदी कलाकार आणि निर्माते म्हणून प्रसिद्ध असून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी विनोदाचे अचूक टायमिंग, जनमानसाची पकड घेणारा अभिनय आणि मराठी संस्कृतीशी खोलवर रुजलेल्या संबंधाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांचा प्रभाव महत्त्वपूर्ण आहे. सर्वाधिक लोकप्रिय आणि आदरणीय अभिनेत्यांपैकी ते एक आहेत.
मुंबईत 4 जून 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. सराफ यांनी मराठी रंगभूमीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि लवकरच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये, विविध भूमिकांमध्ये उत्कृष्ट काम केले असून त्यातून त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शन घडवले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या संस्मरणीय चित्रपटांमध्ये अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दणादण , चौकट राजा आणि नवरा माझा नवसाचा यासारखे अनेक चित्रपट आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान तितकेच उल्लेखनीय आहे. करण अर्जुन, सिंघम, येस बॉस, जोडी नंबर 1 यात आपल्या अभिनयाने त्यांनी ठसा उमटवला. हिंदी विनोदी मालिका हम पांच मधली त्यांची भूमिकाही उल्लेखनीय होती.
सराफ हे मराठी टेलिव्हिजनवरील एक प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. नव्या कलाकारांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. सध्या वयाच्या 78 व्या वर्षी, ते एका आघाडीच्या मराठी वाहिनीवरील दैनिक मालिकेत मुख्य भूमिकेत देखील काम करत आहेत. विनोद आणि भावनिक खोलीचे मिश्रण करण्याच्या त्यांच्या क्षमतेने भारतीय प्रेक्षकांवर कायमचा ठसा उमटवला आहे.
सराफ यांना 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण, 2022 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 11 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आणि भारतीय चित्रपट, रंगभूमी आणि मालिकांमधील योगदानाबद्दल असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सुभाष खेतुलाल शर्मा
सुभाष खेतुलाल शर्मा हे नैसर्गिक शेती करणारे एक यशस्वी शेतकरी आणि नैसर्गिक शेतीचे प्रचारक आहेत. त्यांनी शाश्वत कृषी तंत्रांचे प्रयोग आणि अवलंब यासाठी 30 वर्षांहून अधिक काळ स्वतःला समर्पित केले आहे. त्यांच्या पद्धती नैसर्गिक संसाधनांचे त्यांच्या शुद्ध स्वरूपात संवर्धन करण्यास प्राधान्य देतात, ज्यामुळे विषमुक्त कृषी उत्पादनांचे उत्पादन सुनिश्चित होते.
शर्मा यांनी आपले तंत्र शेतकरी, संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि कृषी विज्ञान केंद्रांमधील कृषी विस्तार अधिकारी आणि कृषी तज्ज्ञांपर्यंत पोहोचवले आहे. त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये, शेती भेटींमध्ये आणि कार्यशाळांमध्ये 200,000 हून अधिक शेतकरी आणि व्यावसायिकांनी भाग घेतला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (महाराष्ट्र), पंजाब कृषी विद्यापीठ (लुधियाना) आणि ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ यासारख्या आघाडीच्या कृषी संस्थांनी त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे. त्यांना 2018 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात नवी दिल्ली येथील परिषदेत आणि बेंगळुरूमध्ये आफ्रिकन राजदूतांसाठी आयसीएआर आयोजित सत्रात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
शर्मा यांना त्यांच्या अग्रगण्य कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यात शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-महाराष्ट्र शासन, 1983, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार-महाराष्ट्र शासन, 2002, सेंद्रिय शेती अवलंब प्रचार प्रसार सन्मान- महाराष्ट्र शासन, 2003 वनराई पुरस्कार- वनराई पुणे, 2004, पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवा पुरस्कार – दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ, 2009, समाज सहयोग पुरस्कार – 2009, जीवन पुरस्कार – 2009 आणि ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार 2019 – दैनिक सकाळ(ॲग्रोवन ) पुणे, या पुरस्कारांचा समावेश आहे. यवतमाळ येथे 2019 मध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.