गोवा खबर

भोमाची मंदिरे वाचवण्‍यासाठी रस्‍ता आराखड्यात बदल करा : गोवा फॉरवर्डची मागणी 

Published

on

Spread the love
गोवा खबर:  भोम येथील सातेरी आणि महादेव ही दाेन्‍ही मंदिरे जुनी आणि ऐतिहासिक स्‍वरुपाची आहेत. त्‍यामुळे या दोन्‍ही मंदिरांना हात न लावता सरकारने भोम येथील राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या आराखड्यात बदल करुन यासाठी नवीन जागा शोधावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग ४अ च्या विस्तारामुळे बाधित झालेल्या भोम गावातील स्थानिकांच्या एका शिष्टमंडळाने माजी मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांच्या शतकानुशतके जुन्या मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी महामार्गाच्‍या जागेत  बदल करण्‍याच्‍या मागणीला पाठिंबा मागितला.
बैठकीनंतर जारी केलेल्या एका निवेदनात सरदेसाई यांनी गोव्यातील भाजप सरकारवर  अाराेप करताना या सरकार गोव्‍यातील मंदिर वारसा नष्‍ट करण्‍याची जणू मोहिम हाती घेतली आहे. पर्वरी येथील जुने मंदिर उध्‍वस्‍त केल्‍यानंतर आता हे सरकार भोमामधील ऐतिहासिक महत्‍वाची सातेरी आणि महादेव मंदिरे पाडण्याची योजना आखत आहे अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.
या दोन्‍ही मंदिरांचे रक्षण करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा हे या आधी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वैयक्तिकरित्या पटवून दिले होते, परंतु राज्य सरकार त्‍यावर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. भोममधील दाेन्‍ही मंदिरांना ५०० वर्षांचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असून ही मंदिरे हटवून सरकार लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असल्याचे वाटते असे सरदेसाई म्‍हणाले.
गावकऱ्यांच्या मते, एक मंत्री आता मंदिराचा किती भाग अबाधित ठेवायचा हे ठरवत आहे याबद्दल सरदेसाई यांनी आश्र्‍चर्य व्‍यक्‍त करताना, “मंत्री मंदिरांच्या सीमा का ठरवत आहेत? महामार्गाजवळ त्यांची जमीन आहे आणि ते रिअल इस्टेटमधून नफा मिळवू इच्छितात म्हणून का?” असा सवाल केला. ‘‘ही मंदिरे बहुजन समाजाची आहेत. भाजप या प्रार्थनास्थळांना लक्ष्य का करत आहे? ते स्वतःला आपल्या देवतांपेक्षा श्रेष्ठ मानतात का?’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मंदिरे वाचविण्‍यासाठी या रस्‍त्‍याचा आराखडा बदलावा ही गावकर्‍यांची मागणी योग्‍य असून गावकर्‍यांच्‍या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्‍यांना न्‍याय मिळावा यासाठी मी सर्वतो प्रयत्‍न करेन असे आश्र्‍वासन सरदेसाई यावेळी दिले.

Trending

Exit mobile version