गोवा खबर : गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांचा प्रस्ताव अत्यंत धक्कादायक असून त्याचा तीव्र निषेध करतो, असे मत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले आहे. भाजप सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे गोव्याच्या पर्यावरण, जीवनशैली आणि अस्मितेवर थेट हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला.
“गोवा ही भाजपच्या धोरणात्मक प्रयोगांची प्रयोगशाळा नाही आणि कधीच होणार नाही,” असे सांगत पाटकर म्हणाले की, गोव्याच्या पर्यावरण, आरोग्य, पर्यटन आणि पारंपरिक व्यवसायांवर अणुऊर्जा प्रकल्पामुळे गंभीर संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही प्रस्तावाला संमती देणार नाही.
ते पुढे म्हणाले, “गोवा ही निसर्गसंपन्न भूमी आहे – येथे जैवविविधता, समुद्रकिनारे, निसर्गरम्य जंगलं आणि मच्छीमारीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. अणुऊर्जा प्रकल्पामुळे या सर्व गोष्टींवर कायमस्वरूपी धोका निर्माण होईल.” त्यांनी चर्नोबिल आणि फुकुशिमा दुर्घटनांचा दाखला देत अशा प्रकल्पांशी संबंधित धोके अधोरेखित केले.
“गोवा हा भौगोलिकदृष्ट्या, संसाधनांच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत अशा प्रकल्पासाठी सुसज्ज नाही,” असे मत त्यांनी नोंदवलं. अणुऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारा मोठा भांडवली खर्च, अफाट पाण्याचा वापर, आणि निर्माण होणाऱ्या अत्यंत धोकादायक कचऱ्याच्या सुरक्षित साठवणुकीचा अभाव हे मुद्देही त्यांनी मांडले.
हा प्रस्ताव केवळ पर्यावरणीय वा आर्थिक नव्हे, तर राजकीयदृष्ट्या गोमंतकीयांच्या हक्कांवर घाला असल्याचा आरोप त्यांनी करत, काँग्रेस पक्ष या प्रस्तावाला सर्व पातळ्यांवर विरोध करेल, असे स्पष्ट केले. “जर केंद्र सरकारने हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर, सभागृहात आणि न्यायालयात तीव्र आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.