गोवा खबर

मुरगांव बंदराने सुरक्षा उपायांमध्ये MARSEC पातळी-2 पर्यंत केली वाढ

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मुरगांव बंदर प्राधिकरणाने त्याच्या अखत्यारीतील सर्व टर्मिनल्स आणि जहाजांवरील सुरक्षिततेत  वाढ करून त्यासाठी एमएआरएसईसी स्तर-1 वरून एमएआरएसईसी  स्तर-2 नुसार सुरक्षेचे उपाय लागू केले आहेत . पाकिस्तानसोबतचा तणाव वाढल्याने आणि शेजारी देशाकडून वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे सुरक्षेची चिंता निर्माण झाल्याने सागरी मालमत्ता आणि हितधारकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

एमएआरएसईसी स्तर 2 लागू करणे याचा अर्थ सुरक्षेला बाधा निर्माण करणाऱ्या घटनांचा धोका वाढल्याची शक्यता असा असून त्या अनुषंगाने काही कालावधीसाठी अतिरिक्त संरक्षणात्मक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक असते.

मुरगांव बंदर प्राधिकरणाचे वाहतूक व्यवस्थापक कॅप्टन हिमांशू शेखर यांनी शुक्रवारी, 9 मे रोजी जारी केलेल्या दिशानिर्देशांमध्ये बंदराच्या सुरक्षा चौकटीत सर्वंकष सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. यात प्रामुख्याने भौतिक अडथळ्यांसह वर्धित परिमिती सुरक्षा आणि निगराणी ठेवणारी यंत्रणा, प्रतिबंधित भागात प्रवेशावर कडेकोट नियंत्रण आणि गस्ती नौकांद्वारे समुद्रात वाढीव दक्षता या उपायांचा समावेश आहे. मालवाहतुकीच्या विशेषत: साठवणुकीचे क्षेत्र, टँक फार्मस आणि धोरणात्मक साठ्यांसाठीचे सुरक्षेचे नियम देखील अधिक कडक केले जातील.

याव्यतिरिक्त, बंदरात नियमित ड्रिल्स आणि सरावांद्वारे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी सज्जता, आंतर-संस्था समन्वय वाढवण्यासोबतच सायबर आणि संप्रेषण प्रणाली सुरक्षा मजबूत करण्यात येत आहे. नियामक चौकटीच्या अनुपालनाचे बारकाईने निरीक्षण केले जात असून कोणत्याही प्रलंबित राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी गुप्तचर आणि बाह्य संस्थांद्वारे सुरक्षा परीक्षण केले जाते.

बंदरामध्ये केवळ आवश्यक तेवढेच कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) ऍक्सेस कंट्रोल कार्ड सतत दाखवणे बंधनकारक असेल. ओळख पडताळणीसाठी सरकारकडून जारी करण्यात आलेले मूळ ओळखपत्र कर्मचाऱ्यांनी जवळ बाळगणे देखील  आवश्यक असेल.

सर्व POL (पेट्रोलियम, तेल आणि वंगण) आणि लिक्विड कार्गो टँक फार्मवरील सुरक्षा, बंदर परिसराच्या आत आणि बाहेर, कठोरपणे अंमलात आणली जात आहे. सर्व हितधारकांनी त्यांच्या सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णवेळ पूर्णपणे कार्यरत आहेत याची खात्री करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या उपायांचा एक भाग म्हणून, बंदरावर सीआयएसएफ द्वारे एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर (ICCC) सुरू  करण्यात आले आहे. आयसीसीशी +91 832 2594477 या क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो, तर पोर्ट कंट्रोल +91 832 2594807 या क्रमांकावर माहिती देण्यासाठी आणि मदतीसाठी सतत उपलब्ध आहे.

काही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची त्वरित पोलिस किंवा CISF कडे तक्रार करण्याची सूचना सर्व संबंधितांना या दिशानिर्देशांमध्ये दिली आहे. बंदराचे कामकाज सुविहितपणे सुरू राहावे यासाठी नो युवर कस्टमर (केवायसी) नुसार आवश्यक माहितीची आणि RFID पासची नियमित पद्धतीने पडताळणी केली जाईल.

Trending

Exit mobile version