गोवा खबर : येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये २१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत २४व्या आयपीसीए जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे गोवा राज्य यजमानपद भूषविणार असल्याची घोषणा चेस फेडरेशन फॉर फिजिकली डिसेबल्ड (सीएफपीडी, दिव्यांगजन बुद्धिबळ महासंघ)द्वारे आज करण्यात आली.
क्रीडा क्षेत्रात सर्वसमावेशकता आणणे आणि दिव्यांगजनांचे सक्षमीकरण करणे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाळगलेल्या दृष्टिकोनाशी सुसंगत म्हणून हा ऐतिहासिक क्रीडा उपक्रमाची ओळखला जाणार आहे.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अधिपत्याखाली दिव्यांगजन बुद्धिबळ महासंघ (सीएफपीडी) कार्यरत असून गोवा राज्या दिव्यांगजन बुद्धिबळ संघटना (जीसीएपीडी)च्या सहकार्याने आणि दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग तसेच राज्य दिव्यांगजन आयोग (गोवा राज्य), भारतीय क्रीडा प्राधिकरण, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांच्या पाठबळाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गोवा राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री तसेच या स्पर्धेच्या आयोजन समितीचे चेअरमन सुभाष फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रमुख मार्गदर्शक महणून दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. व्ही. वल्लवन (आयएएस); राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर; राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण संचालिका वर्षा नाईक; आणि राज्य दिव्यांगजन आयुकत कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांचा समावेश आहे. सीएफपीडीचे प्रतिनिधित्व एम. भास्करन (अध्यक्ष), आनंद बाबू (सचिव), जयवंत जी. हम्मनवार (पॅरालिम्पिक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस), आर. श्रीवत्सन (वरिष्ठ मुख्य सल्लागार) आणि अलोन शुल्मन (चीफ आर्बिटर, आयए ग्रेड ए) हे करणार आहेत.
यजमान संस्था असलेल्या गोवा राज्य दिव्यांगजन बुद्धिबळ संघटना (जीसीएपीडी)च्या वतीने आयोजन समितीमध्ये संघटनेचे अध्यक्ष संजय बेलुरकर, उपाध्यक्ष समीर नाईक, सचिव संजय कवळेकर, खजिनदार बाळकृष्ण व्ही.; तसेच युनिक चेस अकादमी व क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबचे तनीष कवळेकर, कोमल बांदेकर, अमृत नाईक यांचा समावेश आहे.
२४व्या आयपीसीए जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये रशिया, इस्राईल, पोलंड, कझाकस्तान, युक्रेन, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात (युएई), श्रीलंका आणि भारत यासह २०हून अधिक देशांतील १००हून अधिक अव्वल खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. प्रमुख सहभागी बुद्धिबळपटूंच्या यादीत इंटरनॅसन मास्टर गुरबानोव्ह आंद्रे (इस्राईल), एफएम मोलेंडा मार्सिन (पोलंड), एफएम सेव्हेरिनो सँडर (फिलिपिन्स), आयएम ओबोचुक आंद्रे (फिडे), एफएम व्हॅलेंटा विट व्हॅक्लाव (चेक प्रजासत्ताक), सीएम समर्थ राव (भारत) आणि आशियाई पॅरा-चॅम्पियन एफएम वेंकट कृष्णा कार्तिक (भारत) यांचा समावेश आहे. यजमान गोवा राज्यातून संजय कवळेकर आणि अमृत नाईक हे देखील स्पर्धेत भाग घेण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेला प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तींकडून उत्साही पाठिंबा मिळाला असून जागतिक क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुलभ, समावेशक व्यासपीठ निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. ही भूमिका गोव्यातील दिव्यांगजनांच्या प्रतिभेचा आणि कामगिरीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोहळा सादरा करणाऱ्या पर्पल फेस्टच्या भावनेशी सुसंगत असून यातून सर्वांना एकत्र आणण्यात व सक्षमीकरणामध्ये बुद्धिबळ खेळामध्ये असलेली ताकद व क्षमता अधोरेखित होते.