डावीकडून युवराज गावकर, जयेश थळी, राज शर्मा, सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस, संजय घोडगे, नितीन फळदेसाई आणि अनिल नाईक.
Spread the love
गोवा खबर : १७ ते १९ मे या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक जागृतीचा महोत्सव ठरणार आहे. २३ देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, मंदिरांचे विश्वस्त आणि २५ हजारांहून अधिक साधक, भाविक यांचा सहभाग अन् यज्ञयागामुळे हा महोत्सव काशी, उज्जैन, अयोध्येप्रमाणे आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय असणार आहे, त्यामुळे विकासालाही गती मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी आज पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली.
पणजी येथील ‘हॉटेल मनोशांती’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे जयंत मिरिंगकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे नितीन फळदेसाई, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे सुजन नाईक, ब्राह्मण महासंघाचे राज शर्मा, जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी अनिल नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे युवराज गावकर उपस्थित होते.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १ हजार वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ जोतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळणार आहे. हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर त्याचा पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी सांभाळ केला. आता ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने आता हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी १७ ते १९ मे या कालावधीत लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळतील शस्त्रात्रांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.
शंखनाद महोत्सवामुळे पर्यटनात वाढ : या तीन दिवसीय महोत्सवासाठी देशविदेशातून २५ हजारांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास करतील, प्रवास करतील, स्थानिक वाहने वापरतील, मंदिरांना भेट देतील, हॉटेल, बाजार, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे यांचा लाभ घेतील. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळेल. या सर्व प्रक्रियेतून जो जीएसटी, तसेच सेवा कर भरला जाईल त्यामधून राज्य सरकारलाही मोठे उत्पन्न मिळणार आहे.
हा महोत्सव उज्ज्वल अध्यात्मिक भविष्यासाठीचा शंखनाद : अन्य व्यवसायाच्या तुलनेत आध्यात्मिक पर्यटन हे एक सुरक्षित आणि शाश्वत विकासासोबतच समाजातील नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणारे आहे. या महोत्सवामार्फत मंदिर परंपरा, लोककला, सांस्कृतिक ओळख, तसेच साधना, आध्यात्मिक विचारधारा आणि राष्ट्रनिष्ठ मूल्यांचा जागर करण्यात येणार आहे.