गोवा खबर

मंत्री खंवटे यांनी मान्सूनपूर्व तयारीचा घेतला व्यापक आढावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी मान्सून हंगामासाठी राज्याची तयारी सुनिश्चित करण्यासाठी एक सक्रिय पाऊल म्हणून, पर्यटन मंत्र्यांनी काल एक बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रमुख खात्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि भागधारकांना मान्सूनपूर्व तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी एकत्र बोलविण्यात आले होते.

या बैठकीला सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी), वीज खाते, जलस्रोत खाते, जिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कार्यालये, आरोग्य खाते, पोलिस, अग्निशमन सेवा, जिल्हा पंचायत सदस्य कविता गुप्तेश नाईक; सरपंच स्वप्नील चोडणकर; सरपंच सोनिया संजय पेडणेकर आणि सुकूर, पेन्हा दे फ्रांका व साल्वादोर दो मुंडो येथील पंच सदस्य उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना मंत्री खंवटे यांनी मान्सून दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे होणारे धोके कमी करण्यासाठी, आंतर-विभागीय समन्वय आणि वेळेवर कारवाईचे महत्त्व अधोरेखित केले. संवेदनशील भागातील समस्या ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे, ड्रेनेज आणि सांडपाणी संबंधित पायाभूत सुविधा सुधारणे, रस्ता सुरक्षा राखणे, वीज वाहिन्या सुरक्षित करणे आणि मजबूत आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सुनिश्चित करणे, यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन मंत्री खंवटे यांनी केले.

काल झालेल्या बैठकीत जारी केलेल्या निर्देशांवर झालेल्या कारवाईचे मूल्यांकन करण्यासाठी, ८ ते १० दिवसांत एक पाठपुरावा आढावा बैठक बोलावली जाईल, अशी घोषणा मंत्र्यांनी केली. “सर्व खात्यांनी बैठकीत चर्चा केलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण होईल, याची खात्री करावी. यात जबाबदारी घेणे फार महत्त्वाचे आहे. सज्जतेला तडा जाणार नाही, विलंब होणार नाही किंवा कामे अपूर्ण राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. “प्रत्येक खाते, पंचायत आणि भागधारकाने पावसाळ्यात आपल्या समुदायाचे रक्षण करण्यासाठी, सक्रिय योगदान देण्याची खात्री केली पाहिजे,” असेही मंत्री खंवटे म्हणाले.

गेल्या वर्षीच्या कामगिरीचा आढावा घेत, मंत्री खंवटे यांनी खात्यांना यंदा वेळेवर आणि दर्जेदार अंमलबजावणी करून, गतवर्षीपेक्षा अधिक तत्परतेने कामे करण्याचे आवाहन केले. वीज खात्याने हे एक प्रमुख खाते असल्याने, सर्व मान्सूनपूर्व कामे २८ मे पर्यंत पूर्ण करावीत. पावसाळ्यात येणारे व्यत्यय टाळण्यासाठी वेळेवर मंजुरी आणि आवश्यक परवानग्या मिळवाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

बैठकीचा समारोप करताना, मंत्री खंवटे यांनी आंतरविभागीय समन्वय, सामुदायिक भागीदारी आणि जबाबदारी, या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला जेणेकरून या मान्सूनपूर्व तयारीचे प्रभावी परिणाम होतील.

Trending

Exit mobile version