गोवा खबर : गोवा राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय नूतन तसेच नूतनीकरणीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज गोव्यातील शैक्षणिक संस्थांकडे तीन स्कूल बस सुपूर्द केल्या. गृह आणि शहरी विकास महामंडळाच्या (हुडको) कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत या बसेस प्रदान करण्यात आल्या.
पणजी येथील पट्टो येथे असलेल्या पर्यटन भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून हुडकोने या शिक्षण संस्थांना एकूण 75.33 लाख रुपये किमतीच्या या तीन संपूर्णतः सुसज्जित स्कूल बस उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि भरवशाची वाहतूक सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाची सुविधा सहजप्राप्य होण्यासाठी पाठींबा देण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाच्या लाभार्थी संस्था तसेच बसचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
1. शिक्षण प्रसारक संघाचे श्री महालक्ष्मी इंग्रजी माध्यमिक शाळा, तळवली, पोंडा, गोवा
- बसचा नमुना: एसएमएल S7 5100 स्कूल बस
- क्षमता: 52 + 1 सीटर
- लाभार्थी: इयत्ता 1 ली ते 10 वी मधील सुमारे 422 विद्यार्थी
2. गोपालकृष्ण विद्याप्रसारक संस्थेची गोपालकृष्ण माध्यमिक शाळा, साखळी,गोवा
- बसचा नमुना: एसएमएल S7 5100 स्कूल बस
- क्षमता: 52 + 1 सीटर
- लाभार्थी: प्राथमिक शाळेतील सुमारे 103 विद्यार्थी आणि माध्यमिक शाळेतील सुमारे 120 विद्यार्थी
3. शांतीनिकेतन शिक्षण संस्थेची विवेकानंद उच्च माध्यमिक शाळा, बल्ली, क्यूपेम, गोवा
- बसचा नमुना: एसएमएल S7 4240 स्कूल बस
- क्षमता: 42 + 1 सीटर
- लाभार्थी: इयत्ता 11 वी आणि 12 वी मधील सुमारे 133 विद्यार्थी
नवी दिल्ली येथील कार्यालयातील हुडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुलश्रेष्ठ, हुडकोचे ज्येष्ठ कार्यकारी संचालक टेक्कम श्रीधर आणि हुडकोच्या कर्नाटक आणि गोवा विभागाचे विभागीय अध्यक्ष एस. गुरुदत्त या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व आणि वाहतुकीसारख्या पाठबळात्मक सुविधेची गरज यावर अधिक भर दिला. सामाजिक विकासाप्रती हुडकोची बांधिलकी आणि सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून गोव्यातील शैक्षणिक परिसंस्थेच्या उत्थानाप्रती संस्थेने दिलेले योगदान यांची त्यांनी प्रशंसा केली.
सर्वसमावेशक वृद्धीघडवण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पनेनुसार कार्य करत हुडको देशभरातील शहरी तसेच सामाजिक पायाभूत सुविधा विकासाला पाठींबा देण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका निभावत आहे.