गोवा खबर

स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणजे भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा पुरावा : अमित पाटकर

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात स्मार्ट सिटी प्रकल्पातील त्रुटींबाबत केलेल्या कबुलीवर काँग्रेसने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी या वक्तव्याला भाजप सरकारच्या अपयशाची आणि प्रचंड भ्रष्टाचाराची उघड साक्ष ठरवले आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केले आहे की स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे योग्यरीत्या झाली नाहीत आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की काँग्रेस पक्षाने याआधी वारंवार हेच मुद्दे उपस्थित केले होते आणि आज मुख्यमंत्र्यांच्या कबुलीनेच त्याची पुष्टी झाली आहे.

पाटकर यांनी भाजपच्या नेतृत्वावर घणाघात करत सांगितले की, १९९४ पासून सतत पणजीमध्ये भाजपचे आमदार निवडून येत आहेत. त्यामुळे गेल्या तीन दशकांतील विकासाची जबाबदारी पूर्णपणे भाजपवर आहे. जर आज पणजीची अवस्था दयनीय झाली असेल, तर त्याचे पूर्ण श्रेय भाजपच्या अपयशी कारभाराला जाते, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

त्यांनी हेही निदर्शनास आणले की, स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही कामे अपूर्ण, निकृष्ट आणि त्रासदायक ठरली आहेत. या अपयशाची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पणजीकर आता भाजपच्या खोट्या आश्वासनांना कंटाळले आहेत आणि या अपयशाचा हिशेब मागण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्ष पारदर्शक आणि प्रामाणिक प्रशासनासाठी कटिबद्ध असून, पणजीच्या नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version