गोवा खबर

आयओएस सागर जहाजाच्या मॉरिशसमधल्या पोर्ट लुईस भेटीचा समारोप

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारत आणि मॉरिशस यांच्यातील चिरस्थायी संबंध मजबूत करण्यासाठी, हिंद महासागरातील तैनातीच्या कार्यवाहीचा भाग म्हणून 26 ते 28 एप्रिल 25 या कालावधीत,आयओएस सागरने मॉरिशस येथील पोर्ट लुईस, बंदराला वैशिष्ट्यपूर्ण भेट दिली.

या  बंदरभेटीदरम्यान, जहाजाच्या भारतीय कमांडिंग अधिकाऱ्याने मॉरिशस तटरक्षक  दलाच्या  कमांडंट अधिकाऱ्याची भेट घेतली आणि दोन्ही सागरी सैन्यांमधील सहकार्य मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. बहुराष्ट्रीय दलातील निवडक कर्मचाऱ्यांनी मॉरिशस पोलीस दलातील विशेष मोबाईल फोर्स स्क्वॉड्रन, मेरीटाइम एअर स्क्वाड्रन, कोस्ट गार्ड ट्रेनिंग स्कूल आणि पोलीस हेलिकॉप्टर स्क्वाड्रन या प्रमुख प्रशिक्षण सुविधांना भेट दिली आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या भेटीने ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्याची आणि सागरी सुरक्षेतील परस्पर हिताच्या क्षेत्रांवर चर्चा करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली.

सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून, बहुराष्ट्रीय कर्मचारी आणि मॉरिशस पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या सहभागासह वर एक विशेष संयुक्त योगाभ्यास सत्र आयोजित करण्यात आले.राष्ट्रीय तटरक्षक दलाचे कमांडंटही या कार्यक्रमाला उपस्थित होते.  आयओएस सागर  आणि मॉरिशस पोलीस दलाचे कर्मचारी  यांच्यात एक मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल सामना देखील खेळला गेला. आयओएस सागरने अभ्यागतांसाठी आपले डेक उघडून, मॉरिशस पोलीस दलाचे सदस्य, अनिवासी भारतीय आणि इतर उत्साही अभ्यागतांचे स्वागत केले.  अभ्यागतांना जहाजाचा फेरफटका घडविण्यात  आला आणि तिच्या ऑपरेशनल क्षमता, नेव्हिगेशन सिस्टम आणि जहाजावरील जीवनाबद्दल माहिती दिली गेली.

पोर्ट लुईस येथून निघाल्यानंतर,आयओएस सागर मॉरिशस तटरक्षक दला सह विशेष आर्थिक क्षेत्रावर संयुक्त गस्त घालणार आहे.निर्धारित कार्यक्रमानंतर , जहाज सागरी सुरक्षा, प्रादेशिक सहकार्य आणि हिंद महासागर क्षेत्रामध्ये सागर सद्भावना वाढवण्याचे आपले ध्येय पुढे चालू ठेवत पुढच्या प्रवासात सेशेल्स येथील पोर्ट ऑफ व्हिक्टोरियाला भेट देण्यासाठी जाईल.

Trending

Exit mobile version