गोवा खबर

मराठीला गोव्याची राजभाषा घोषित करा : गोवा मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा मराठी पत्रकार संघाने २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदन सादर करून गोव्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

 निवेदनात नमूद केले आहे की, भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, ही भाषा प्राचीन काळापासून गोव्याची सांस्कृतिक व साहित्यिक ओळख राहिली आहे. गोव्यातील आद्य ग्रंथकार कृष्णदास शामा यांनी इ. स. १५६२ मध्ये लिहिलेल्या श्रीकृष्णचरित्रकथा पासून ते फादर थॉमस स्टीफन्स यांच्या क्रिस्तपुराण पर्यंत मराठीतील साहित्य परंपरा अखंड सुरू आहे.

संघाने स्पष्ट केले की, गोव्याचे धार्मिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक व्यवहार प्राचीन काळापासून मराठीतूनच होत आले आहेत. जुन्या शिलालेखांपासून ग्रामसंस्थेच्या लिखित व्यवहारांपर्यंत सर्व ठिकाणी मराठीचा वापर असल्याचे दाखवत त्यांनी मराठीचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा अधोरेखित केला.

“गोव्याच्या संस्कृतीची खरी भाषा मराठी आहे. त्यामुळे मराठीला गोव्याची अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता द्यावी,” अशी ठाम मागणी संघाच्या अध्यक्ष वामन प्रभू, उपाध्यक्ष गुरुदास सावळ, सुरेश स. नाईक, सुभाष कृ. नाईक तसेच कार्यकारिणी सदस्य नितीन कोरगावकर, विठ्ठल गावडे पारवाडकर व सुधाकर नाईक यांनी केली.

या निवेदनावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा काय प्रतिसाद येतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Trending

Exit mobile version