ही केवळ नोकरीची संधी नसून राष्ट्र सेवेचे उत्तरदायित्व : श्रीपाद नाईक
गोवा खबर : पणजी येथे आयोजित 15 व्या रोजगार मेळाव्यात सरकारी नोकरीसाठी निवड झालेल्या 47 युवकांना केंद्रीय ऊर्जा तथा नवीन आणि नवकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
ही केवळ सरकारी नोकरीची संधी नसून राष्ट्र सेवेचे उत्तरदायित्व आहे. त्यामुळे समर्पण-इमानदारी-विनम्रतेने देशातील जनतेची सेवा करण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे. देश सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. प्रशासकिय कार्यातून लोकशाही सक्षम आणि समृद्ध करण्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडा असा आग्रह नाईक यांनी यावेळी बोलताना केला.
बदलत्या परिप्रेक्षात प्रशिक्षणासह कौशल्य, ऊर्जा आणि क्षमतेने कार्य केल्यास आपल्या कर्तव्यात नक्कीच यश मिळेल. देशाचे नागरिक म्हणून आपण आपले कार्य करून कुटुंबियांचे स्वप्न साकारण्या सोबतच भारताला वैश्विक शक्ति बनवण्यास हातभार लागेल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.
गोवास्थित सीजीएसटी, सीमाशुल्क विभाग, टपाल विभाग, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, भारतीय जीवन वीमा महामंडळ, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया आदी विभागात आज या 47 नवनियुक्त तरुणांना सेवेची संधी मिळाली आहे.
इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे आयोजित या रोजगार मेळाव्याला पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोनसेरात, सीमाशुल्क विभागाचे आयुक्त सुनील देशमुख, सीजीएसटी चे आयुक्त बिपिनकुमार उपाध्याय यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तत्पूर्वी, 15 व्या रोजगार मेळाव्यात आज देशभरातील 47 ठिकाणी 51,000 हून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आलीत. पंतप्रधान मोदी यांनी आभासी पद्धतीने केलेल्या संबोधनाचे थेट प्रसारण यावेळी करण्यात आले.