गोवा खबर : गोवा पर्यटन विकास महामंडळतर्फे (जीटीडीसी), द सेंट रेगिस गोवा रिसॉर्ट, मोबोर, कासावली, सासष्टी यांच्या सहकार्याने, ‘हॉस्पिटॅलिटी ओरिएंटेशन आणि ऑपरेशन्स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. आदरातिथ्य क्षेत्रामध्ये एक तल्लीन करणारा अनुभव देण्यासाठी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेने, जीटीडीसीच्या अधिकाऱ्यांना हॉटेलचे कामकाज आणि ग्राहक सेवांविषयी, मौल्यवान माहिती दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन सेंट रेगिस गोवा रिसॉर्टचे महाव्यवस्थापक सतीश कुमार, तसेच जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गॅविन डायस (हॉटेल्स, मार्केटिंग), लक्ष्मीकांत वायंगणकर (प्रशासन); कपिल पैंगीणकर (वित्त); आणि सचिन गोरे (अभियांत्रिकी), दीपक नार्वेकर, उपमहाव्यवस्थापक (हॉटेल्स/मार्केटिंग), संदीप गावस, उप महाव्यवस्थापक (प्रशासन); आणि जीटीडीसी व सेंट रेगिसच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यशाळेने जीटीडीसीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे सॉफ्ट स्किल्स, संवाद क्षमता आणि कामकाजातील ज्ञान वाढवण्यावर भर दिला.
सेंट रेगिसमधील वक्त्यांनी अतिथी सेवा उत्कृष्टता, हॉटेलचे अंतर्गत कामकाज आणि सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण समाविष्ट असलेल्या परस्परसंवादी सत्रांचे नेतृत्व केले. या समर्पित अशा संवाद सत्रामुळे, रिसॉर्टची संसाधन टीम आणि जीटीडीसीचे अधिकारी यांच्यातील विचारांची देवाणघेवाण सुलभ झाली. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सहभागींना रिसॉर्टच्या मार्गदर्शित दौऱ्यावर नेण्यात आले, ज्यात प्रमुख क्षेत्रे जसे की लगून, कॉकटेल मिक्सिंग स्टेशन, हॉटेल लॉबी, हॉटेलमधून समुद्रकिनारी प्रवेश, ‘हार्ट ऑफ द हॉटेल’चा कामकाज विभाग आणि इतर महत्त्वाच्या विभागांबद्दल जाणून घेण्यात आले.
जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर आणि सेंट रेगिस गोवा रिसॉर्टचे महाव्यवस्थापक सतीश कुमार यांच्या हस्ते, कार्यशाळेत सहभागी सदस्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना पारंपरिक कुणबी शाल, साड्या, जॅकेटसह प्रमाणपत्रे आणि हॉटेलकडून भेट प्रदान करण्यात आली.
जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर प्रमाणपत्र वितरण समारंभास उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी, जीटीडीसीच्या कर्मचाऱ्यांना गोव्यातील एका प्रमुख लक्झरी रिसॉर्टमध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल, कृतज्ञता व्यक्त केली. जीटीडीसी आणि पर्यटनाशी संबंधित देत असलेल्या सेवांचा दर्जा वाढवण्यासाठी सदर कार्यशाळेतून मिळालेला अनुभव आणि ज्ञान महत्त्वपूर्ण योगदान देईल, यावर त्यांनी भर दिला. डॉ. गावकर यांनीही कार्यशाळेच्या आयोजनासाठी सेंट रेगिस संघाचे सहकार्य आणि पाठींब्याबद्दल आभार व्यक्त केले.
जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर म्हणाले, कि “अशा प्रकारच्या कार्यशाळा आमच्या कार्यसंघांना, उद्योगातील सर्वोत्कृष्ट गोष्टींकडून शिकण्यास आणि आमच्या सेवा व कार्यक्षेत्रातील मानकांमध्ये त्यातील पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करतात. अशा उपक्रमांद्वारे, आमच्या टीम्सना पर्यटन व्यवस्थेमध्ये अपवादात्मक अनुभव देण्यासाठी आवश्यक कौशल्ये, मानसिकता आणि एक्सपोजरसह सुसज्ज करण्याचे आमचे ध्येय आहे”.
सेंट रेगिस गोवा रिसॉर्टचे महाव्यवस्थापक सतीश कुमार यांनी, जागतिक दर्जाचे गंतव्यस्थान म्हणून राज्याचे स्थान पुढे नेण्यासाठी गोवा पर्यटनासोबत भागीदारी करण्याच्या रिसॉर्टच्या अटूट बांधिलकीची पुष्टी केली. त्यांनी रिसॉर्टच्या उत्कृष्टतेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यावर आणि लक्झरी आदरातिथ्यामध्ये नवीन स्तर स्थापित करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी अभिमानाने सांगितले, की सेंट रेगिस गोवाची आदरातिथ्यात मजबूत व्याप्ती असून त्यांचे अतिथी, येथील सेवांबाबत अत्यंत समाधानी होऊन निघतात. हा त्यांच्या पाहुण्यांच्या विश्वासाचा आणि निष्ठेचा पुरावा आहे.
यावेळी महाव्यवस्थापक गेविन डायस आणि उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांचीही भाषणे झाली. सेंट रेगिस गोवा रिसॉर्टचे मानव संसाधन, व्यवस्थापक डोरिन मास्करेन्हास यांनी देखील कार्यशाळे दरम्यान मदतीचा हात पुढे केला.
या कार्यशाळेत जीटीडीसीच्या महाव्यवस्थापकांपासून ते रेसिडन्सीच्या व्यवस्थापकांपर्यंत, ३० वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
ही कार्यशाळा गोव्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील, ज्ञानाची देवाणघेवाण आणि कौशल्य विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कार्यशाळा सेवा उत्कृष्टता आणि व्यावसायिक वाढीसाठी असलेली सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते.