गोवा खबर : सुरईशतर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या सहयोगाने व ग्लोबस मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. च्या सौजन्याने २६ एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजता लोकप्रिय अभिनेत्री, संगीतकार, गायिका, निर्माती मधुराणी गोखले प्रभुलकर यांचा सहभाग असलेला , कवितेचे पान अन् गीततरंग हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे.
यात ‘आई कुठे काय करते’.. मालिकेद्वारे रसिकांची अमाप लोकप्रियता मिळवलेल्या मधुराणी गोखले प्रभुलकर या आपल्या खास शैलीत कविता सादर करणार आहेत व भावमधुर गीते पेश करतील. त्यांच्या सोबत ‘सुर नवा ध्यास नवा..’ची उपविजेती अंतरा कुलकर्णी व टॉप चा मानकरी आदिश तेलंग हे गायक विविधरंगी मराठी गीते गाणार आहेत. त्यांना नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), तारानाथ होलेगद्दे (तालवाद्य) दिगज बेणे (संवादिनी) हे साथसंगत करतील. प्रा. श्रिया टेंग्से यांचे निवेदन असेल.
मधुराणी गोखले प्रभुलकर
मधुराणी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अभिनयाची सुरुवात केली व २००० सालापासून चित्रपट, मालिका मधून प्रभावी अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. त्यांचीच निर्मिती असलेल्या सी सॉ या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा पुरुषोत्तम करंडक लाभला.२००३ साली झी मराठी वरील इंद्रधनुष्य मालिकेत त्यांनी काम केले व त्याच वर्षी त्यांनी गोड गुपीत चित्रपटाची निर्मितीही केली.
याच दरम्यान तुमचं आमचं सेम असतं व नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांनी भूमिका वठवल्या.२००८ मध्ये झी मराठी सारेगमप च्या सेलिब्रिटी शो मध्ये सहभाग देवून आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली यामुळे सुंदर माझे घर.. चित्रपट त्यांच्याकडे चालत आला. आई कुठे काय करते.. मधील आई च्या भूमिकेने तर त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. लेकरू, मुख्यमंत्री गणप्या गावडे, मंगळसूत्र, भाभी पीडिया, आरोहन, जिथून घडल्या गाठी अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका स्मरणीय ठरल्या.
आदिश तेलंग
सुर नवा ध्यास नवा.. चा महाअंतिम फेरीचा मानकरी व झी मराठी सारेगमप चा टॉप चार चा मानकरी आदिश याला अक्षयकुमार व अनू कपूर यांच्याकडून स्टँडिंग ओव्हेशन लाभले आहे. बेंगाल टायगर्स कार्यक्रमात आशाताई भोसले यांच्या सोबत गाण्याची संधी त्याला लाभली. रेडिओ सीटी ९१.१ चा तो सुपर सिंगर ठरला. अनेक वेब फिल्मसाठी त्याने पार्श्वगायन केले आहे.
अंतरा कुलकर्णी
सुर नवा मध्ये सर्वात लहान असलेल्या अंतराने महागुरू अवधूत गुप्ते व महेश काळे यांना प्रभावित केले होते. मंजुश्री खोत आणि रफिक शेख यांच्याकडून तिने शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले आहे. कलर्स कन्नडा व झी टीव्ही वरील रियालिटीज शो मध्ये गाऊन तिने रसिकांची दाद मिळवली आहे. वयाच्या ११ व्या वर्षी दूरदर्शनवरील लव्ह मी इंडिया रियालिटी शो मध्ये भाग घेऊन ती टॉप ची ती मानकरी ठरली. अभिनेत्री काजोल समोर मेरे ख्वाब मे जो आये.. हे गीत तिने सादर केले होते. कलर्स सुपरवर कन्नडा कोगिले शो मध्ये तिने टॉप टेनपर्यंत मजल मारली होती.२०२२ मध्ये झी टीव्ही हिंदी च्या स्वर्ण स्वर भारत या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात गाणारी कर्नाटकातील ती एकमेव गायिका होती. बाल वयात अनेक स्पर्धा तिने गाजवल्या आहेत.
हा कार्यक्रम रविवार २७ रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता रवींद्र भवन मडगाव तर्फे मडगाव येथे होणार आहे. दोन्ही कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.