गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीने मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या निर्धार आंदोलनाचा पुढचा टप्पा — “प्रखंडशः मेळावे” — शनिवार, २६ एप्रिल रोजी मांद्रे प्रखंडातून सुरू होणार आहे. ही माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
मांद्रे प्रखंडातील मेळावा श्रीभगवती मंदिराजवळील जिल्हा पंचायत सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या मेळाव्याची सुरुवात देवीच्या दर्शन, आशीर्वाद व गाऱ्हाण्याने होणार असून, स्थानिक जनतेचा सहभाग अपेक्षित आहे.
३१ मार्च रोजी मिनेझीश ब्रागांझा सभागृह, पणजी येथे झालेल्या मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली होती. प्राथमिक जनजागरण व संघटनाच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रखंड मेळाव्यात स्थानिक प्रखंड समितीची निवड करण्यात येणार आहे.
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये गोव्यातील विभागणी करण्यात आलेल्या एकूण १८ प्रखंडांमध्ये हे मेळावे होणार असून, मराठी राजभाषा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार समितीने केला आहे.
एप्रिल २०२५ मध्ये होणारे प्रखंड मेळावे पुढीलप्रमाणे:
मांद्रे – शनिवार, २६ एप्रिल, सायं. ५.३० वा., स्थळ: जिल्हा पंचायत सभागृह, श्रीभगवती मंदिराजवळ
सत्तरी – रविवार, २७ एप्रिल, सकाळी १० वा., स्थळ : गोविंद काणेकर सभागृह, वाळपई
शिरोडा – मंगळवार, २९ एप्रिल, सायं. ५ वा., स्थळ : श्री रवळनाथ सभागृह, शिरोडा
वेलिंगकर यांनी सर्व मराठीप्रेमींना या मेळाव्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.