गोवा खबर

बांबोळी समुद्रकिनाऱ्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यटन खात्याने ग्रँड हयात हॉटेलला बजावली कारणे दाखवा नोटीस

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने बांबोळी येथे मेसर्स रिव्हरसाइड रिसॉर्ट आणि हॉलिडे होम प्रा. लि. द्वारा संचालित ग्रँड हयात हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रिटेनिंग वॉलचे अनधिकृत बांधकाम आणि समुद्रकिना-याच्या परिसरात उत्खननातील मलब्याचा ढिगारा टाकण्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे.

विश्वसनीय स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि खात्याच्या अधिका-यांनी १६/०४/२०२५ रोजी केलेल्या तपासणीनंतर असे आढळून आले आहे, कि या कंपनीने समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात सुमारे ३०० मीटर लांबीची राखीव भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या उत्खननात दगड आणि धातूच्या तारा असलेल्या मलब्याचा ढिगारा समुद्रकिनाऱ्यावर टाकण्यात आल्याचीही नोंद करण्यात आली आहे.

अशी कृती गोवा टुरिस्ट प्लेसेस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट, २००१च्या तरतुदींचे उल्लंघन करते आणि कायद्याने परिभाषित केल्यानुसार सार्वजनिक उपद्रव निर्माण करते. या ठिकाणी टाकलेल्या साहित्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना अडथळा निर्माण होत असून यामुळे दैनंदिन समुद्रकिनारा स्वच्छता आणि जीवरक्षक कार्यात देखील अडथळा येत आहे तसेच बांबोळी समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटन क्षमतेवर विपरित परिणाम होत आहे.

खात्याने या कंपनीला तात्काळ सदर ठिकाणावरून सर्व मलबा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे आवाहन केले आहे, तसे न केल्यास कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक कारवाई केली जाणार आहे.

Trending

Exit mobile version