गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारखाने आणि बॉयलर मंत्री नीलकंठ हळर्णकर यांच्या उपस्थितीत आज बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे कारखाने आणि बॉयलर निरीक्षक कार्यालयाने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या पहिल्या गोवा व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन आणि शिखर परिषदेचे उद्घाटन केले.
या शिखर परिषदेचे उद्दिष्ट म्हणजे व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार करण्यासाठी व्यापक चर्चासत्र आणि गट चर्चा यासाठी व्यासपीठ प्रदान करणे असा आहे
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्यात आयोजित करण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे ज्यामध्ये संपूर्ण उद्योगात सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे असे सांगितले. या शिखर परिषदेचे उद्दिष्ट कारखाने आणि अनेक क्षेत्रांच्या पलीकडे जाऊन कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल जागरूकता, ज्ञान आणि कृतीला प्रोत्साहन देणे आहे असे आहे असे ते म्हणाले.
औद्योगिक आणि रस्ते अपघातांमध्ये वाढ ही अधिक चिंतेची बाब आहे. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबांची काळजी घेत असल्याने सुरक्षितता आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. हे प्रदर्शन म्हणजे योग्य दिशेने घेतलेले एक मोठे पाऊल आहे. यामध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण आणि दैनंदिन सुरक्षितता, जीव वाचविण्यासाठी ज्ञान यांचा समावेश आहे. गोव्यातील आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लोकांचा सहभाग पाहून मला अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
हे प्रदर्शन उद्योगातील लोकांसाठी आणि विशेषतः सुरक्षिततेच्या उद्देशाने उपयुक्त आहे. प्रदर्शकांनी नवीनतम तंत्रज्ञान उपकरणे आणि सुरक्षितता उपाय याची माहिती दिली. हा कार्यक्रम धोरणकर्ते, व्यावसायिक आणि उद्योगातील लोकांमध्ये शिक्षण, नवोपक्रम आणि सहकार्याचे केंद्र आहे. सरकार सुरक्षितता, निरोगी आणि कामाभिमुख औद्योगिक वातावरणासाठी वचनबद्ध आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन गोवा सरकारने विकसित गोवा २०३७ या योजनेपासून सुरुवात केली आहे.
पुढे बोलताना, मुख्यमंत्र्यांनी कारखाने आणि बॉयलर्स निरीक्षकांनी पुन्हा एकदा गोव्यातील तरुणांना बॉयलर ऑपरेटर म्हणून नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी बॉयलर अटेंडर्स अभ्यासक्रम सुरू केला आहे अशी माहिती दिली. त्यामुळे उद्योगांना नवीनभविष्याचे मार्ग उघडण्यास मदत होईल. सुरक्षा प्रशिक्षण शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरकारने औद्योगिक सुरक्षा, विद्युत, अग्नि प्रतिबंधक, मानसिक आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन तयारीचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले आहेत. तसेच तरुणांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच सरकारने एक स्किल ऑन व्हील कार्यक्रम सुरू केला आहे जो एक मोबाईल ट्रेनिंग युनिट आहे ज्यामध्ये साधने, तंत्रज्ञान आणि शिक्षण साहित्य आहे. हे युनिट पणजीपासून राज्यातील ग्रामीण भागात फिरेल आणि तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देईल. स्किल ऑन व्हील कार्यक्रमासाठी सुमारे २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि निश्चितच या कार्यक्रमामुळे प्रत्येक क्षेत्रात तरुणांचे कौशल्य, पुनर्कौशल्य आणि कौशल्यवृद्धी होईल असे ते म्हणाले.
त्यांनी अधिक अवलंबून असलेल्या आणि सरकारी संस्थांना नोकरीभिमुख आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणारे अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रोत्साहित केले. हा कार्यक्रम एक सुरक्षित आणि मजबूत राज्य निर्माण करील आणि तरुणांना स्वावलंबी बनण्यास सक्षम करील. औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले आणि त्यामुळे त्यांना भविष्य घडविण्याची चांगली संधी मिळेल असे ते म्हणाले. पंतप्रधानांचे विकासित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी गोवा सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
हळर्णकर यांनी हा कार्यक्रम कार्यस्थळे सुरक्षित, आरोग्यदायी आणि सर्वांसाठी चांगली बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असे सांगितले. याचा फायदा केवळ उत्पादन क्षेत्रालाच नाही तर बांधकाम, आदरातिथ्य, खाणकाम, आरोग्यसेवा, किरकोळ विक्री, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांना होईल असे ते म्हणाले. ही नवीन गोष्ट शिकण्याची, तज्ञांना भेटण्याची आणि उपयुक्त ज्ञान मिळविण्याची संधी आहे. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर शिकण्याची, दुरुस्त करण्याची आणि चांगल्या सुरक्षितता आणि आरोग्यासाठी एकत्र काम करण्याचे हे एक व्यासपीठ आहे. गोव्यातील तरुणांसाठी ही शिखर परिषद योग्य ज्ञान मिळविण्याची, त्यांना औद्योगिक क्षेत्रात स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नोकऱ्या सुरक्षित करण्यासाठी सक्षम करण्याची अमूल्य संधी देते. समृद्ध गोवा निर्माण करण्यासाठी आपण राज्यात अधिक उद्योग आकर्षित केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
सेझा गोवा आयर्न ओरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू यांचेही यावेळी भाषण झाले. कारखाने आणि बॉयलर्सचे सचिव संजीत रॉड्रिग्ज आयएएस यांनी स्वागत केले तर कारखाने आणि बॉयलर्सचे मुख्य निरीक्षक अनंत पांगम यांनी आभार मानले.