गोवा खबर

एआय फॉर इंडिया २०३० उपक्रमांतर्गत एआय सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा औद्योगिक विकास महामंडळ  (गोवा-आयडीसी) द्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सहकार्याने “एआय फॉर इंडिया २०३०” उपक्रमांतर्गत ‘एआय इनोव्हेशनच्या माध्यमातून सूक्ष्म-लघु उद्योगांचे सक्षमीकरण या विषय़ावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.

या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील नेते, शैक्षणिक संस्था, समाजिक संघटना आणि सरकारी प्रतिनिधी एकत्र येत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या धोरणात्मक परिणामांवर मंथन केले आणि जबाबदार एआय प्रशासनासाठी धोरण प्रारूप तयार केले.

भारताच्या आर्थिक विकासात सुमारे एकतृतियांश वाटा असलेल्या आणि रोजगार व उद्योजकता संधी निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या सूक्ष्म-लघु उद्योग क्षेत्राच्या कामकाजामध्ये एआयचा वापर वाढवणे, सूक्ष्म-लघु उद्योग क्षेत्रात एआयचे एकत्रीकरण करण्यावर भर देणे ही “एआय फॉर इंडिया २०३०” उपक्रमांतर्गत उद्दिष्टे आखण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे उत्पादकता, सर्जनशीलता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा व्यवसायामध्ये अवलंब करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून विकसित ‘एआय प्लेबुक फॉर एसएमई’ याचे सादरीकरण होय.

या कार्यशाळेत गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक, सी4आयआर इंडियाचे प्रमुख पुरुषोत्तम कौशिक, सी4आयआर इंडियाच्या एआय आणि डेटा पॉलिसी तज्ज्ञ आयुषी सरना, सी4आयआर इंडियाच्या एआय आणि एमएलचे प्रमुख हर्ष शर्मा आणि बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) चे फेलो संभव केला यांच्यासह नामवंत उद्योगतज्ञांनी आपले विचार मांडले.

कार्यशाळेत गोव्यातील ३० उद्योग संस्थाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रतिनिधींनी कार्यशाळेत खालील प्रमुख उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले:

  • सूक्ष्म-लघु उद्योगांमधील डिजिटायझेशनच्या वास्तव स्थितीचे अवलोकन करणे आणि एआय तंत्रज्ञानाच्या अवलंबाबाबतची तयारी याचे मूल्यमापन करणे
  • उद्योग-विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या उच्च-मूल्याच्या एआय-चालित उपायांचा शोध घेणे
  • विविध उद्योगांच्या गरजांनुरूप अधिक महत्व असलेल्या एआयआधारित उपाययोजनांचा शोध घेणे
  • एआयचा अवलंब आणि डिजिटल परिवर्तन सुलभ करण्यात शासनाची भूमिका यावर विचारमंथन करणे

कार्यशाळेत बोलताना, गोवा-आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक यांनी औद्योगिक सेवा-सुविधांच्या विकासासाठी व सुलभीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत महामंडळाने राबवलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. त्यांनी व्यवसाय सुलभतेसाठी विकसित प्लॅटफॉर्मवर विशेष भर दिला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यावसायिक भूखंडाचे विचरण, हस्तांतरण निर्णय आणि सबलीजिंगची सुविधा अशा विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, एकेकाळी भूखंड उपलब्धतेबाबतची जाहिरात जारी करण्यासाठी जवळजवळ २५ टप्पे असलेली प्रक्रिया आता अवघ्या काही क्लिक्समधून पूर्ण करता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अभिषेक यांनी गोव्यात बांधकाम मंजुरींना गती देण्यासाठी विकसित केलेली ऑनलाइन बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल सिस्टम [OBPAS] याचीही ओळख उपस्थितांना घडविली. ते म्हणाले, “गोवा-आयडीसी आता औद्योगिक उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी एआयच्या एकात्मिकतेला प्राधान्य देत आहे. एआयमध्ये नावीन्यपूर्णता आणि कार्यक्षमता वाढवून सूक्ष्म-लघु उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. गोवा-आयडीसी आता एक सक्षम वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे जिथे एसएमईना व्यवसाय वाढवण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी एआय-चालित उपायांचा वापर करू शकतील.”

सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन (C4IR) इंडियाचे प्रमुख पुरुषोत्तम कौशिक यांनी स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकांबाबत सुरवातीला असलेली शंका कालांतराने दूर कशी झाली हे स्पष्ट केले. अशा बैठकांमधून सरकार, व्यवसाय, संशोधन आणि स्टार्टअप्समधील सहकार्य वाढीला लागून नाविन्यपूर्ण उपाययोजना मिळत राहत असल्याचे कालांतराने सर्वांच्याच लक्षात आले. श्री. अभिषेक यांच्यासारखे धुरीणांनी सहकार्य वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न राबवल्याबाबत त्यांनी कौतुक केले. केवळ वरून आलेले धोरण राबवण्यापेक्षा सर्वच घटकांमध्ये संवाद घडवून खरे परिवर्तन घडते यावर त्यांनी भर दिला. “एआय फॉर इंडिया २०३०” या उपक्रमावर प्रकाश टाकताना, त्यांनी एआयला तळागाळापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट अधोरेखित करत त्याद्वारे दुर्गम भागातील लहान व्यवसायांनाही त्याचा लाभ देणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले. हे उद्दिष्ट एक आव्हान आहे आणि त्याचबरोबर प्रभावी परिणाम साधण्यासाठी अनोखी संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

सी४आयआर इंडिया येथील एआय आणि डेटा पॉलिसी तज्ज्ञ आयुषी सरना यांनी व्यवसायांमध्ये एआयच्या व्यावहारिक अवलंबाबाबत संवादात्मक सत्राचे नेतृत्व केले. यामध्ये सहभागी प्रतिनिधींनी क्यूआर कोडच्या माध्यमातून विविध प्रश्नांवरील प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेत आपला उद्योग, या उद्योगातील आव्हाने आणि संस्थेचे स्वरूप याबाबत विचार मांडले.

कार्यशाळेत स्मार्ट लिंक, किनेको ग्रुप आणि एसएआयएस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आदी आघाडीच्या कंपन्यांसह इलेक्ट्रॉनिक्स, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन क्षेत्रातील उद्योगसंस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, जवळजवळ ३०% प्रतिनिधी निर्यात कामाचा अनुभव असलेले होते, ज्यांनी अनुपालन सुलभ करण्यासाठी आणि पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढविण्याबाबत एआय तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.

एआय तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवण्याबाबत धोरण आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यासाठी प्रशासन, उद्योग नेते आणि तंत्रज्ञान विकास क्षेत्रातील तज्ञ या घटकांमधील सहकार्याचे महत्त्व या कार्यशाळेतून अधोरेखित झाले. या कार्यशाळेत झालेले विचारमंथन व समोर आलेल्या सूचना यांचे महत्व धोरण निश्चितीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत, तसेच जबाबदार आणि नैतिक एआय पद्धतींचे पालन करताना भारतातील एसएमईंना एआय एकात्मतेचा फायदा होईल याची निश्चिती करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतील. एआय-आधारित विश्वात यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म-लघु उद्योगांना आवश्यक असलेली साधने आणि उपाययोजना उपलब्ध करण्याची गरज या कृती-केंद्रित परिणामांवर लक्ष केंद्रित केलेल्या कार्यशाळेतून समोर आली.

Trending

Exit mobile version