गोवा खबर

62 व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : 62 व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सोमवारी मुंबईतील राजभवनात झाले.

मुंबईतील मेसर्स सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेड यांच्या  “एस. एस. लॉयल्टी” या वाफेवर चालणाऱ्या पहिल्या भारतीय जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईहून लंडनला प्रयाण केले. भारतीय सागरी इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणून दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. 30 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत मर्चंट नेव्ही सप्ताह साजरा केला जात असून, यंदा सप्ताहाची संकल्पना ‘समृद्ध समुद्र – विकसित भारत आणि नील अर्थव्यवस्था आणि हरित वाढीसाठी युवा पिढी’ अशी आहे.

उद्घाटन सोहळ्याला नौवहन महासंचालक व एनएमडीसी (सेंट्रल) समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन, भा.प्र.से., यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या पेहरावावर मर्चंट नेव्ही दिनाचे सूचक असलेले लघु ध्वजपदक लावून या सप्ताहाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला नौवहन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एससीआय) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच एनएमडीसी (सेंट्रल) समितीचे उपाध्यक्ष कॅप्टन बी. के. त्यागी, प्रमुख सर्वेक्षक व अतिरिक्त महासंचालक (अभियांत्रिकी) अजित सुकुमारन, प्रमुख जहाज सर्वेक्षक-सह-संयुक्त महासंचालक (तंत्र) प्रदीप सुधाकर के. आणि विविध सागरी संघटनांचे अधिकारी व प्रमुख उपस्थित होते.

नौवहन महासंचालकांनी राज्यपालांचे मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन केल्याबद्दल आभार मानले आणि राष्ट्रीय सागरी दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच महासंचालनालय व अन्य संबंधित सागरी संस्थांच्या विविध यशस्वी कामगिरींची माहिती दिली.

हा सप्ताह सागरी उद्योग क्षेत्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी नियतकालिके, वर्तमानपत्रे, चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रदर्शन, स्पर्धा इत्यादींच्या माध्यमातून ज्ञान व माहितीच्या देवाण-घेवाणीवर भर देणार आहे. तसेच, भारतीय सागरी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निवडक व्यक्तींना ‘सागर सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सागरी संस्थांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

भारताच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी 95% व्यापार (वजनानुसार) आणि 75% व्यापार (मूल्यानुसार) समुद्री मार्गाने होतो. त्यापैकी सुमारे 92% व्यापार परदेशी नोंदणीकृत जहाजांद्वारे केला जातो. भारताला 7500 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून देशात जवळपास 14,500 किलोमीटर अंतर्देशीय जलमार्ग आणि 200 पेक्षा जास्त लहानमोठी बंदरे आहेत. नौवहन महासंचालकांनी ही माहिती दिली.

भारतात 6 लाख 89 हजाराहून अधिक नोंदणीकृत भारतीय नौकानयन कर्मचारी आहेत, त्यापैकी दरवर्षी सुमारे 3 लाख 7 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो. त्यातील 90.44% कर्मचारी परदेशी जहाजांवर आणि 9.46 % भारतीय जहाजांवर कार्यरत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात, भारतातील मोठ्या आणि छोट्या बंदरांनी एकूण 1540.34 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) मालवाहतूक हाताळली, तर 2022-23 मध्ये ही संख्या 1,432.84 दशलक्ष एमएमटी होती. मागील वर्षीच्या तुलनेत 7.5%  इतकी वाढ या आकडेवारीत दिसून येते.

भारतीय सागरी प्रशासनासाठी महिला सशक्तीकरण एक प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांना नौकानयन व्यवसायात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजघडीला भारतीय महिला नौकानयन कर्मचाऱ्यांची संख्या 14,255 वर पोहोचली आहे. ही संख्या गेल्या दशकात 739% वाढ दर्शविते, असे महासंचालकांनी नमूद केले.

इतिहासातील दाखला देत राज्यपालांनी चौल साम्राज्याचा दक्षिणपूर्व आशियातील विजय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे योगदान यांचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी शासकीय विभागांमध्ये समन्वयाची गरज दर्शवली. तसे जहाजांचे व मालवाहतुकीच्या परतफेऱ्यांमधील वेळ कमी करून वाहतुकीचा खर्च कमी करण्यासंदर्भातील मुद्द्यावर भर दिला.

राज्यपालांनी वाढवण बंदराच्या विकासाचा विशेष उल्लेख केला आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बंदरांचा आदर्श घेऊन ते आधुनिक सुविधांनी युक्त करावे, अशी सूचना केली. सागरी क्षेत्रातील विविध संघटनांशी सुसंवाद वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

तसेच, हरित इंधनाचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक सागरी उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावेत, भारतात पुरेसा कंटेनर साठा उपलब्ध करून देण्यासाठी ‘कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ (कॉनकॉर) सोबत सहकार्य वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्यपालांनी एनएमडीसी (सेंट्रल) समिती, सागरी उद्योगातील सर्व भागधारक आणि नौवहन कर्मचाऱ्यांना मर्चंट नेव्ही सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, हा कार्यक्रम केवळ औपचारिक राहू नये; तर राजभवनात सागरी क्षेत्राच्या विकासासाठी नियमित संवाद व्हावा आणि सहकार्य वाढावे, अशी इच्छा व्यक्त केली.

Trending

Exit mobile version