गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारापूर – सर्वण येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पंचायत इमारतीचे उद्घाटन केले.
गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कारापूर – सर्वणच्या सरपंच तन्वी सावंत, उपसरपंचा दिव्या नाईक, गट विकास अधिकारी ओंकार मांद्रेकर आणि इतर पंच सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गावांमध्ये सामुदायिक शेती करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. कृषी खात्याच्या विविध योजनांद्वारे सामुदायिक शेती किफायतशीर असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी गावांमध्ये उपलब्ध असलेल्या नापीक जमिनीचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी करावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम, सरकारच्या नेतृत्वाखालील उपक्रम म्हणजे राज्यातील प्रत्येक गाव आणि शहराला स्वावलंबी बनविणे असा असल्याचे सांगितले. स्वयंपूर्ण गोवा अभियानाचे यश प्रामुख्याने स्थानिक पंचायतींवर अवलंबून आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना प्रेमेंद्र शेट यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेवर भर दिला आणि अशा सरकारी योजनांमुळे पंचायत इमारती प्रत्यक्षात आल्या आहेत असे सांगितले. ते म्हणाले की, मये मतदारसंघात आतापर्यंत २७ कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. शेट म्हणाले की त्यांना मये मतदारसंघ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची इच्छा असून ज्यासाठी त्यांनी जनतेकडून सहकार्याची अपेक्षा केली आहे.
सुरवातीस तन्वी सावंत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना स्मृतिचिन्ह भेट देण्यात आली.