गोवा खबर : ‘सुरईश’ आणि कला संस्कृती संचालनालय गोवा यांच्यातर्फे कृष्णाई विष्णू कोरगावकर फॅमिली असोसिएशन कोरगाव व श्री संस्थान कमलेश्वर महारुद्र कोरगाव यांच्या सहयोगाने लोककला, संगीत व नृत्याचा आविष्कार घडविणारा विविधरंगी ‘कला महोत्सव’ ३० मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून देऊळवाडा कोरगाव येथील श्री भुमिका मंदिराच्या प्रांगणात रंगणार आहे.
लोकरंग
कला महोत्सवात लोकरंग सत्रात कुर्टी फोंडा येथील कलारंग केळबाई लोककला पथक समई नृत्य, कळशी फुगडी, देखणी, कुणबी नृत्य अशी पारंपरिक लोकनृत्ये सादर करणार आहे.
गीतरंग
गीतरंग या सत्रात मराठी भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते, युगुलगीते अशा विविधरंगी गीतांची मेजवानी असेल. यात कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ची उपमहागायिका संज्योती जगदाळे (पुणे), व्हॉट्सअप चित्रपटासाठी गायिलेली युवा गायिका श्रुती जोशी (पुणे) व ‘सुर नवा ध्यास नवा’चा महाअंतिम फेरीचा मानकरी नवाब शेख (गोवा) गाणार आहेत. त्यांना नितीन कोरगावकर (तबला) बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), शिवानंद दाभोलकर (संवादिनी) हे नामवंत वादक साथसंगत करतील तर समृध्दी गणपुले हिचे निवेदन असेल.
लावण्यरंग
या सत्रात युविका कुबडे, आरोही नाईक, दित्या शिरवईकर व सई सरकार या नव्या पिढीतील अनेक स्पर्धा गाजविलेल्या गोमंतकीय नृत्यांगना लावण्या व शास्त्रीय नृत्यावर आधारित सिनेनृत्य सादर करतील.
संज्योती जगदाळे
संज्योती सध्या ख्यातनाम गायिका विदुषी आरती अंकलीकर यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या त्या संगीत अलंकार आहेत . झी मराठी सारेगमप लिटल चॅम्प च्याही त्या मानकरी होत्या. राष्ट्रीय स्तरावर गायनासाठी चंदिगड व राजस्थान येथे त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. दिग्गज गायक गायिकांसोबत त्यांचे सतत कार्यक्रम सुरू असतात.
नवाब शेख
नवाब याने हरिद्वार येथे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे तसेच उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्वरयोद्धा स्पर्धेत तो विजेता ठरला. पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या आजीवन संगीत अकादमीच्या वैश्विक संगीत स्पर्धेतही नवाबने पुरस्कार प्राप्त केला होता. प्रसिद्ध संगीत शिक्षक शरद मठकर यांच्याकडे तो अनेक वर्षे शास्त्रीय गायन शिकत आहे.
श्रुती जोशी
प्रसिद्ध युवा गायिका श्रुती जोशी हिने सपने अपने अपने नाटकासाठी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले गीत गायले आहे. झी मराठी सारेगमप लिटल चॅम्पची च्या ती मानकरी होती. बोले इंडिया जयभीम या हिंदी चित्रपटासाठी आया बारिशोंका मौसम हे गाणे ती गायिली आहे. अतुल अरुण दाते यांच्या नवा शुक्रतारा मध्ये ती गायिली आहे. पुणे पेशन आयकॉनची ती मानकरी आहे. स्वीट श्रेया घोषाल या श्रेया घोषाल यांनी गायिलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात ती प्रमुख गायिका होती.