गोवा खबर: गोवा पर्यटन खाते राज्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ करण्यासाठी धोरणात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सक्रियपणे काम करत आहे. हे उपक्रम गोव्याचा समृद्ध वारसा, अध्यात्म आणि अंतर्गत आकर्षणे ठळक करतात आणि शाश्वत पर्यटनाला चालना देऊन स्थानिक समुदायांना सक्षम बनवतात.
स्वदेश दर्शन योजनेंतर्गत, विकासातील प्रमुख प्रकल्प म्हणजे पर्वरी क्रीक एक्सपिरिअन्स. हा प्रकल्प या परिसरातील एक गजबजलेले सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र होईल, या उद्देशाने तयार केला आहे. कोलवा समुद्रकिनाऱ्यावरील सुधारणा या स्थानिक वैशिष्ट्यांसोबत आरामदायी अनुभव देतील तसेच अभ्यागतांना जवळपासच्या व्यवसायांशी जोडण्यासाठी आणि या भागाची आर्थिक परिसंस्था समृद्ध करण्यास प्रोत्साहित करेल. या सुधारणांमुळे केवळ अभ्यागतांच्या अनुभवांमध्येच भर पडणार नाही तर होमस्टे, कॅफे आणि लहान उद्योगांसाठी पर्यटकांच्या संख्येतही वाढ होईल.
गोव्यातील अध्यात्मिक पर्यटन सेवा देखील विकासासाठी सज्ज आहेत. यात्रेकरू आणि पर्यटक दोघांनाही अधिक समृद्ध असा अनुभव मिळावा, यासाठी जुने गोवे येथील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस प्रसाद योजनेअंतर्गत विकसित केली जात आहे.
या विकासाची गती पुढे नेत, एकादशा तीर्थ सर्किट अकरा प्रतिष्ठित मंदिरांना जोडून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करते व गोव्याच्या अध्यात्मिक वारशात अभ्यागतांना अविस्मरणीय असा अनुभव देते. जसे प्रवासी या मंदिराच्या वाटेवर निघतील, त्यांना स्थानिक कारागीर, शेतकरी आणि पारंपारिक कलाकुसर, पाककृती आणि पद्धतींचे प्रदर्शन करणाऱ्यांविषयी जाणून घेण्याची संधी मिळेल.
Celebrate the vibrant #ShigmotsavParade2025 as it travels across Goa from March 15-29
नार्वे येथील मांडवी, जुवारी आणि वाळवंटी नद्यांच्या संगमावर गोमंत सरिता पूजनाचा अनुभव पर्यटकांना घेता येईल, ज्यामुळे गोव्याचे आध्यात्मिक पर्यटन आकर्षण आणखी वाढेल. नदीकाठावरील हरित-सचेत पद्धतींवर लक्ष केंद्रित करून, स्थानिक परंपरा स्वीकारण्यासाठी अभ्यागतांना आमंत्रित करताना, पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
फर्मागुढी येथील छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम हे या परिवर्तनाला वेगळा आयाम जोडणारे असेल. ही अत्याधुनिक सुविधा आकर्षक व्हिज्युअल, परस्परसंवादी प्रदर्शन आणि ऑगमेंटेड रिॲलिटी रूम्स, होलोग्राम आणि फाइव्ह डी थिएटर यांसारख्या प्रभावी आकर्षणांद्वारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा साजरा करेल. विविध सुविधांनी पूरक असा हा प्रकल्प समुदाय-चालित उद्योगांच्या विकासासाठी विविध मार्ग तयार करण्यासाठी आहे.
“व्यवसायांना सक्षम बनवणाऱ्या, रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करणाऱ्या आणि स्थानिक उद्योजकांच्या भरभराटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून गोव्याचा आर्थिक पाया मजबूत करण्यावर आमचे लक्ष आहे,” असे माननीय पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले. “अंतर्गत गंतव्ये विकसित करून, आम्ही व्यवसाय वाढवण्यास, नोकऱ्या निर्माण करण्यास आणि राज्यभरातील उपजीविका सुधारण्यास लोकांना पाठींबा देत आहोत.”
या दूरगामी उपक्रमांद्वारे, ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ हे ध्येय राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास पोहोचेल याची खात्री करत आहे. व्यवसायांचे पोषण करून, शाश्वत पर्यटनाला चालना देऊन आणि सांस्कृतिक संपत्तीचे जतन करून, गोवा राज्य आपल्या समृद्ध वारशा इतकेच दोलायमान आणि वैविध्यपूर्ण असे भविष्य निर्माण करण्यास सज्ज आहे.