गोवा खबर : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग अंतर्गत अनुदानित संस्था टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी) आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (आयएईए) ने आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये टीएमसीला आयएईएच्या रेज ऑफ होप उपक्रमासाठी “अँकर सेंटर” म्हणून मान्यता देण्यात आली. हा स्वाक्षरी समारंभ मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमधील रुस्तम चोक्सी सभागृहात झाला.
यावेळी आयएईएचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी, ऑस्ट्रियातील भारताचे राजदूत आणि व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय संघटनांचे स्थायी प्रतिनिधी शंभू एस. कुमारन, अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मोहंती, टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रोसी यांनी 2022 मध्ये सुरू झालेल्या ‘रेज ऑफ होप’ उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली. या सामंजस्य करारामुळे, टीएमसीला अधिकृतपणे आशिया-प्रशांत क्षेत्र आणि आफ्रिकन देशांसाठी अँकर सेंटर म्हणून मान्यता मिळाली असून जागतिक स्तरावर कर्करोग उपचार आणि संशोधनाला चालना देण्यात त्याची भूमिका अधिक मजबूत झाली आहे.
कुमारन यांनी 2004 मध्ये सुरू करण्यात आलेल्या आयएईएच्या कर्करोग उपचारांसाठी कृती कार्यक्रम (PACT) प्रति भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, ज्यात जागतिक कर्करोग उपचार सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून, भारताने आपले भाभाट्रॉन हे स्वदेशी रेडिओथेरपी मशीन, मंगोलिया, श्रीलंका आणि मादागास्करसह अनेक विकसनशील देशांना भेट म्हणून दिले आहे. याव्यतिरिक्त, टीएमसी तज्ञांनी आयएईएच्या imPACT मोहिमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे, ज्यामुळे अनेक देशांना त्यांच्या कर्करोग उपचार क्षमता वृद्धिंगत करण्यात मदत झाली आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ. अजित कुमार मोहंती यांनी टीएमसीच्या माध्यमातून प्रगत कर्करोग उपचारांसह आयएईए सोबत अनेक उपक्रमांमधून शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर सुलभ करण्यासाठी अणुऊर्जा विभाग देत असलेले सहाय्य , त्याची वचनबद्धता आणि प्रयत्न अधोरेखित केले.
टीएमसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी आयएईए उपक्रमांमध्ये संस्थेचे व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि योगदान यावर भर दिला. यामध्ये तज्ञांच्या मोहिमा, क्वाट्रो सारखे गुणवत्ता हमी कार्यक्रम आणि आफ्रिका, मध्य पूर्व, बांगलादेश, मॉरिशस आणि फिलीपिन्स आणि मंगोलिया सारख्या इतर राष्ट्रांसाठी लाभदायक प्रशिक्षण/फेलोशिप कार्यक्रमांचा समावेश आहे.
होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टीएमसी, विशाखापट्टणमचे संचालक डॉ. उमेश महंतशेट्टी यांनी भारतातील कर्करोग उपचारांमध्ये टीएमसीच्या प्रदीर्घ योगदानाचा आढावा घेताना पंजाब, वाराणसी, गुवाहाटी आणि विशाखापट्टणममधील किफायतशीर , व्यापक कर्करोग उपचार सुविधांचे जाळे अधोरेखित केले. 1981 पासून आयएईएसोबत टीएमसीच्या खोलवर रुजलेल्या भागीदारीवरही त्यांनी भर दिला, तसेच संशोधन, प्रशिक्षण आणि प्रगत कर्करोग उपचार प्रोटोकॉलच्या विकासात टीएमसीची व्यापक भूमिका विशद केली.
स्वाक्षरी समारंभानंतर, ग्रोसी यांनी टीएमसीच्या जागतिक दर्जाच्या सुविधांची पाहणी केली, ज्यामध्ये होमी भाभा ब्लॉक, रोग व्यवस्थापन क्लिनिक, क्लिनिकल रिसर्च सेक्रेटरीएट (सीआरएस) आणि संस्थात्मक आचारसंहिता समिती (आयईसी) यांचा समावेश आहे.