गोवा खबर : राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आधुनिक बदल घडवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करताना नवे प्रकल्प येणेही आवश्यक आहे, असे सांगून डिचोलीचा मास्टर प्लान तयार करून विकासाचा आराखडा तयार करा, नगर विकास खात्यामार्फत सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आवाहन नगर विकासमंत्री विश्वजित राणे यांनी केले.
डिचोली पालिका विभागातील रोटरी क्लब आवारात उभारण्यात झालेल्या पार्कचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, दीपा पळ, स्थानिक नगरसेविका अपर्णा फोगेरी, नगरसेवक, भाजप मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, अभियंता हुसेन मुजावर, स्वप्निल दीक्षित, वल्लभसाळकर, दामोदर प्रभू, कुंदन व चंदन फोगेरी उपस्थित होते.
राणे म्हणाले, डिचोली हा तालुक्याचा केंद्रबिंदू असल्याने या भागातही वेगवेगळ्या ठिकाणी जागा निश्चित करून वॉकिंग ट्रॅक, बालोद्याने, महिलांसाठी योजना, स्वीमिंग पूल या माध्यमातून शहराला आधुनिक प्रकल्पांचा साज पुरवणे गरजेचे आहे. आमच्या खात्यातर्फे डिचोली शहरात अनेक योजना सुरू आहेत.
विकासाला आधुनिकतेचा साज पुरवताना नवे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. डिचोलीचा विकासाचा आराखडा तयार करताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार शेट्ये यांनी केले.
अपर्णा फोगेरी यांनी या भागात सुसज्ज अशा पार्क उभारून सुविधा, तसेच इतर सुविधा डिचोलीवासीयांना उपलब्ध करून दिल्याबद्दल राणे व डॉ. शेट्ये यांचे आभार मानले. यावेळी इतर नगरसेवकही उपस्थित होते.