गोवा खबर : माजी भाजप मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेल्या धक्कादायक प्रकटीकरणामुळे सरकारमध्ये काहीच काम होत नाही आणि सर्व मंत्री पैसे कमवण्यात व्यस्त आहेत, हे पुन्हा एकदा उघड झाले आहे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मडकईकर यांनी एका मंत्र्यास 15-20 लाख रुपये दिल्याचे मान्य केले आणि त्याला भ्रष्टाचार म्हणूनच नव्हे तर थेट लूट म्हणून वर्णन केले. हे भाजपच्या स्वतःच्या पक्षातल्या भ्रष्टाचाराबाबत बोलणारे एकंदरीत चौथे मोठे भाजप नेते आहेत. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी म्हटले होते की, ते इतर मंत्र्यांसारखे पैसे घेत नाहीत. त्याचप्रमाणे भाजपचे आमदार गणेश गावकर आणि बाबूश मोन्सेरात यांनी थेट कबूल केले होते की सरकारी नोकरीसाठी पैसे घेतले जातात, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.
यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत गप्पच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांनी एकदा ना खाऊंगा, ना खाने दूँगा असे म्हटले होते, त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपचे राज्य प्रभारी बी. एल. संतोष यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. विरोधी पक्षाने या सरकारचे विविध घोटाळे सतत उघड केले तरीही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप चोडणकर यांनी केला.
हा भ्रष्टाचार गोव्यातील जनतेला थेट लुटत आहे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला हानी पोचवत आहे. याची चौकशी व्हायला हवी. भाजपचे आमदार आणि पक्षाचे सदस्यही निराश झाले आहेत, कारण त्यांनाही कामे करून घेतण्यासाठी लाच देणे भाग पडत आहे. गोवा या लुटीला आणखी सहन करू शकत नाही, असा इशारा चोडणकर यांनी दिला आहे.