गोवा खबर

मराठी संगीताचा सुवर्णकाळ गोव्यात अवतरणार

Published

on

Spread the love

गोवा खबर :  प्रसिद्ध गीतकार जनकवी पी सावळाराम यांच्या अजरामर गीतांवर आधारित ‘कल्पवृक्ष कन्येसाठी ‘हा मुंबईतील सृजन विरार या नामांकित संस्थेची निर्मिती असलेल्या सांगितिक आणि नाट्यमय कार्यक्रमाचे तीन प्रयोग गोवा मराठी पत्रकार संघाने आयोजित केले असून या कार्यक्रमातून मराठी संगीताचा सुवर्णकाळच गोव्यात अवतरेल असे संघाचे अध्यक्ष वामन प्रभू यांनी आज पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देताना सांगितले.

प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनकवी पी. सावळाराम यांच्या कारकिर्दीचा प्रवास रसिकांसमोर उलगडणारा हा कार्यक्रम आहे. गोवा कला सस्कृती संचालनालयाचे सहकार्य संघाला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लाभले आहे अशी माहितीही प्रभू यांनी दिली.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ७ ते ९ मार्चपर्यंत अनुक्रमे मडगाव, पणजी आणि साखळी येथे आयोजित केले असून नामवंत गायक आणि वादक कलाकार यात सहभागी होणार आहेत. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, देव जरी मज कधी भेटला, सावध हरिणी सावध ग, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का अशा अवीट गोडीच्या जुन्या अजरामर गीतांचा कार्यक्रम नामवंत गायक कलाकार सादर करणार असून त्यात आजची प्रसिद्ध पार्श्वगायिका माधुरी करमरकर, सारेगमप फेम धनंजय म्हसकर, लिटल चॅम्प पलाक्षी दिक्षित, प्रज्ञा गावंड, श्रद्धा प्रभू, सोहम फाटक आदि गायक कलाकारांचा समावेश आहे. ‘शिवा’ मालिका फेम मृणालिनी जावळे, अमित पटेल, श्रद्धा मालप हे कलावंत नाट्यमय भागात रसिकांसमोर येतील. या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन संदीप फाटक यांचे असून श्रद्धा प्रभू यांचे संहिता लेखन आहे.

ADVT Viva Carnaval 2025 from 1st to 4th March across Goa! Get ready for dazzling parades, music, and pure joy!

पी सावळाराम यांच्या गीतांची खासियत अशी की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर म्हणजे अगदी जन्मापासून ते बोहल्यावर चढणाऱ्या नवरीपर्यंत आणि मातृत्वाची चाहूल लागलेल्या आईपासून ते संसारात पूर्ण रममाण झालेल्या स्त्रीपर्यंत तिचे भावविश्व, तिचे सगळे नातेसंबंध या सगळ्या कंगो-यांसह तिचे अवघे जीवन व्यापून टाकेल अशी गाणी त्यांच्या हातून लिहीली गेली आहेत. इतकेच नव्हे तर मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला हे अप्रतिम गीतही त्यांच्याच सिध्दहस्त लेखणीतून उतरले आहे असेही या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना अध्यक्ष वामन प्रभू यांनी सांगितले आणि महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ चा पहिला प्रयोग ७ मार्च रोजी रात्री ८ वाजता रवींद्र भवन मडगाव येथे होणार असून गौवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमाच्या आयोजनात मानस डेव्हलपर्स आणि राजदीप बिल्डर्स यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले आहे. मंगळवार दि ४ मार्चपासून या कार्यक्रमाच्या प्रवेशिका मडगाव रवींद्र भवन आणि कला अकादमी पणजी येथे उपलब्ध होणार असून रसिक प्रेक्षकानी न चुकवावा असा हा कार्यक्रम आहे. मडगाव व पणजी येथील कार्यक्रमासाठी काही जागा राखीव असणार आहेत. संघाचे सरचिटणीस सुभाष कृ नाईक, उपाध्यक्ष सुरेश स नाईक हेही यावेळी हजर होते.

प्रेक्षकांमधील महिलेचा गौरव

रसिक प्रेक्षकांमधीलच एका महिलेचा गौरव जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या तिन्ही कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गायक कलाकारांच्या हस्ते केला जाणार आहे. ‘प्रतिकात्मक महिला गौरव’ असे त्याचे स्वरूप असेल. महिलांना थिएटरमध्ये प्रवेश करताना आपली नावे नोंदवायची असून यातील एकीची सोडत काढून सत्कारासाठी निवड होईल.

Trending

Exit mobile version