गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय यावे व त्यात गोमंतकीयांना जास्तीत जास्त जागा उपलब्ध व्हाव्यात, असे आपणास वाटते. आपण व मुख्यमंत्री एकत्र बसून यावर निर्णय घेण्यात येईल. नर्सिंग महाविद्यालयासाठी आवश्यक प्रक्रिया झालेली असल्याने सर्व संबंधितांना विश्वासात घेत लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
कुडतरी राय येथील सेंट तेरेझा कॉन्व्हेंट विद्यालयाच्या परिसरात गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळ आणि डेंटल महाविद्यालय व इस्पितळ यांच्या सहकार्यातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आरोग्यमंत्री राणे, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, धर्म पाहून आजारपण येत नाही. आरोग्यसेवा कशाप्रकारे सुधारण्यात यावी यासाठी काम केले जात आहे. घरातील एखाद्याचे आरोग्य चांगले नसल्यास घरातील स्थितीही बिघडत जाते हे अनेकांनी अनुभवले असेल. आजाराची वेळीच तपासणी होऊन योग्य उपचार होण्याची गरज भासत आहे. त्यासाठी आरोग्यसेवा सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही ज्या सुविधा घेऊ शकतो, त्याच सुविधा सर्वसामान्य व्यक्तीलाही मिळाव्यात यासाठी काम केले जात आहे.वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांचे धीराचे दोन शब्द लोकांच्या जीवनात बदल आणू शकतात, त्यांना आजारात लढण्यास सक्षम बनवू शकतात. लोकांचे जीव वाचावेत यासाठी योग्यवेळी उपचार मिळण्यासाठी आरोग्य खाते प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा इस्पितळातील सुविधांबाबतचे आपले व मुख्यमंत्र्यांचेही म्हणणे एकच असेल. पक्षाचे वरिष्ठही आम्हाला मार्गदर्शन करत असतात. लोकांच्या हिताचे काय आहे, याचा विचार केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात नर्सिंग महाविद्यालयासाठीची आवश्यक तरतूद करण्यात आली होती, त्यावेळी आपण खासगी वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी यावे, अशी मागणी केली होती. मात्र, नर्सिंग महाविद्यालयासाठी तरतूद झालेली असल्याने व लोकांनाही त्याचा फायदा होणार असल्याने नर्सिंग महाविद्यालयव्हावे असे मला वाटते. याबाबतचा निर्णय कुणावरही न लादता सर्व संबंधितांशी चर्चेअंतीच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कुडतरीतील जनतेला या महाशिबिराचा लाभ झाला याचा आनंद आहे. यानंतरही ज्यांच्यावर उपचार किंवा शस्त्रक्रिया करावयाच्या आहेत, त्यातही प्राधान्य देण्यात येणार आहेत. यात कोणतेही राजकारण नसल्याचे वक्तव्य आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केले.
राज्यातील सर्व फार्मसींमध्ये आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेला फार्मासिस्ट असावा, अशा सूचना केलेल्या आहेत. अन्न व औषध खात्याकडून राज्यातील सर्व भागांतील फार्मसींची तपासणी केली जाते. ज्या फार्मसीमधून आयुष्य संपलेली औषधे आढळून येतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.