गोवा खबर

मोदी यांची जहान -ए-खुसरो 2025 महोत्सवाला उपस्थिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे आयोजित जहान -ए-खुसरो 2025 या सूफी संगीत महोत्सवाला उपस्थित राहिले.

देशाच्या कला आणि संस्कृतीसाठी जहान -ए-खुसरो सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत मोदी म्हणाले की ते महत्त्व आणि शांती दोन्ही प्रदान करतात. त्यांनी अधोरेखित केले की, 25 वर्षे पूर्ण करत असलेल्या या कार्यक्रमाने लोकांच्या हृदयात एक महत्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे, जी एक मोठी उपलब्धी आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी डॉ. करण सिंग, मुझफ्फर अली, मीरा अली आणि इतर सहकार्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी रुमी फाउंडेशन आणि जहान ए-खुसरोशी संबंधित सर्वांना भविष्यात असेच यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी, पंतप्रधानांनी लवकरच सुरु होणाऱ्या पवित्र रमजान महिन्या निमित्त सर्व उपस्थितांना आणि देशातील नागरिकांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी महामहिम प्रिन्स करीम आगा खान यांच्या योगदानाचे स्मरण केले, ज्यांचे सुंदर नर्सरी वाढवण्यातील प्रयत्न लाखो कलाप्रेमींसाठी वरदान  ठरले आहेत.

पंतप्रधानांनी गुजरातच्या सुफी परंपरेत सरखेज रोजाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की, काही वर्षांपूर्वी या जागेची स्थिती अतिशय वाईट झाली  होती, परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिच्या जीर्णोद्धारावर  लक्ष केंद्रित केले. पंतप्रधानांनी सरखेज रोजामध्ये भव्य कृष्ण उत्सवाचे आयोजन केले जायचे त्या काळाची आठवणही करून दिली, ज्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहायचे. आजही वातावरणात कृष्ण भक्तीचा रस आहे असे त्यांनी नमूद केले. “मी सरखेज रोजा येथे होणाऱ्या वार्षिक सूफी संगीत महोत्सवात नियमितपणे सहभागी होत असे,” असे मोदी म्हणाले. सूफी संगीत एक सामायिक वारसा आहे जो जीवनातील सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणतो. नजर- ए – कृष्णाच्या सादरीकरणातूनही हा सामायिक सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित झाला, असे  मोदी यांनी  सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, जहान -ए -खुसरो आयोजनात एक अनोखा सुगंध आहे, हा हिंदुस्थानच्या मातीचा सुगंध आहे. हजरत अमीर खुसरो यांनी भारताची तुलना स्वर्गाशी केली होती याची आठवण त्यांनी करून दिली, त्यांनी देशाचे वर्णन संस्कृतीची बाग असे केले होते जिथे संस्कृतीचा प्रत्येक पैलू बहरला  आहे. “भारताच्या मातीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा सूफी परंपरा येथे आली तेव्हा तिला या भूमीशी एक नाते असल्याचे जाणवले.  बाबा फरीद यांची  आध्यात्मिक शिकवण , हजरत निजामुद्दीनच्या मैफिलींमधून प्रज्वलित झालेले प्रेम आणि हजरत अमीर खुसरो यांच्या काव्यातून निर्माण झालेले नवीन रत्न, हे  एकत्रितपणे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सार आहेत “, असे  मोदी यांनी नमूद केले.

या सोहळ्यात सहभागी होऊन त्याचा आनंद घेण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Trending

Exit mobile version