गोवा खबर

पारदर्शकता, जबाबदारी आणि सुशासनाला चालना देण्यासाठी माहिती अधिकार कायदा एक शक्तिशाली साधन: केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त

Published

on

Spread the love

गोवा खबर:केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त श्री हिरालाल समरिया यांनी पारदर्शकता, जबाबदारी आणि सुशासनाला चालना देण्यासाठी आरटीआय कायदा हे एक शक्तिशाली साधन आहे यावर भर दिला. पणजीतील पाटो येथे राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री अरविंद कुमार एच. नायर, राज्य माहिती आयुक्त श्री आत्माराम आर. बर्वे, आयुक्त-तथा-सचिव (माहिती आणि प्रसिध्दी खाते) श्री रमेश वर्मा, आयएएस, गोवा राज्य माहिती आयोगाच्या सचिव श्रीमती सरिता गाडगीळ आणि माहिती आणि प्रसिद्धी संचालक श्री दीपक बांदेकर यांच्या उपस्थितीत गोवा राज्य माहिती आयोगाच्या सुधारित वेबसाइटच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

श्री समरिया यांनी पुढे बोलताना लोकशाहीमध्ये मतदारांना सरकारच्या कामांची माहिती असणे आवश्यक आहे असे सांगितले. ही पारदर्शकता साध्य करण्यासाठी माहिती अधिकार कायदा एक महत्त्वाचे साधन म्हणून काम करते. सरकारी कामामध्ये पारदर्शकता असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते आणि योग्य निर्णय घेण्यास कृती करावी लागते. प्रशासन जे केवळ कार्यक्षमच नाही तर नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यावरही केंद्रित असते असेही त्यांनी सांगितले.

राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री. अरविंद कुमार एच. नायर यांनी यावेळी बोलताना आयोगासमोरील प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणे हे आमचे सध्याचे प्राधान्य आहे असे सांगून २०२५ च्या अखेरीस सर्व प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रकरणात कमीत कमी सुनावणींची मर्यादा ठेऊन प्रकरणे निकाली काढण्याचे आमचे ध्येय आहे असे ते म्हणाले.

राज्य माहिती आयुक्त श्री आत्माराम आर. बर्वे यांचेही यावेळी भाषण झाले.

Trending

Exit mobile version