गोवा खबर : आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने आज (फेब्रुवारी 14) बंगळुरू येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन सत्राला उपस्थित राहत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. भारताची नारीशक्ती आकांक्षा, यश आणि योगदान देण्यासाठी पुढे पुढे वाटचाल करत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
विज्ञान असो, क्रीडा असो, राजकारण असो, कला असो किंवा संस्कृती असो,आपल्या भगिनी आणि कन्या आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.त्यांची कामगिरी कुटुंब,संस्था आणि देशासाठी अभिमानास्पद ठरत आहे, असे कौतुक राष्ट्रपतींनी केले.
मनोबलाशिवाय अडसर पार करणे आणि रूढीवादी कल्पनांना आव्हान देणे शक्य नाही, असे राष्ट्रपती म्हणाल्या.त्यांनी प्रत्येक महिलेला धैर्य एकवटण्याचे, मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती आणि क्षमतांचा वापर करण्याचे आवाहन केले.आपल्या ध्येयाप्रती उचललेले प्रत्येक छोटे पाऊल हे विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल आहे,असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शिक्षण क्षेत्रात आर्ट ऑफ लिव्हिंग अनेक उपक्रम राबवत असल्याबाबत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.आपल्या मुलांच्या शिक्षणापेक्षा अन्य कोणतीही मोठी गुंतवणूक नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. योग्य मार्गदर्शन आणि पाठबळामुळे अनेक मुले आपल्या राष्ट्राच्या प्रवासात सक्रिय सहभागी होऊ शकतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या.