गोवा खबर : पर्वरी मतदारसंघातील सुकूर ग्रामपंचायतीत जेएमजे पंपिंग स्टेशनजवळ पंपिंग व्यवस्थेसह १००० कम सम्पच्या बांधकामाची पायाभरणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाली.
यावेळी सुकूरच्या सरपंच सोनिया पेडणेकर व इतर पंच सदस्य उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) हाती घेतलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट या प्रदेशातील पाणी पुरवठा पायाभूत सुविधा वाढवणे, हे आहे. ज्यामुळे शांतीनगर, सुकूर, पंचायत क्षेत्र, वर्षा कॉलनी, अराडी आणि सुकूर ग्रामपंचायतीच्या २० पॉइंट कॉलनीतील सुमारे ३,००० रहिवाशांना फायदा होईल.
हे बांधकाम ३० जानेवारी २०२५ रोजी सुरू झाले असून ते ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाच्या व्याप्तीमध्ये १०००एम³ आरसीसी सम्प विकसित करणे, दोन उच्च-क्षमतेच्या पंपांची स्थापना (प्रत्येकी १५०एम³/तास) आणि विद्यमान ओव्हर हेड रिझर्व्हॉयर (ओएचआर) पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी पाइपलाइन जोडणी या गोष्टी समाविष्ट आहेत.
खंवटे यांनी शाश्वत शहरी विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला. मजबूत आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा व्यवस्था सुनिश्चित करणे, हे सरकारचे मुख्य प्राधान्य आहे. हा प्रकल्प गोव्यातील रहिवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पाण्याच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांना दर्शवितो. पर्वरी येथे नवीन १५ एमएलडी जलशुद्धीकरण प्लांट सुरू झाल्यामुळे, हे सम्प स्थानिक पातळीवर पाणी साठवण आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याव्यतिरिक्त, या प्रकल्पामध्ये जागा सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी संरक्षण भिंत बांधणे समाविष्ट आहे.