गोवा खबर

यंदाच्या परीक्षा पे चर्चा उपक्रमात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप त्यांनी केले.

निरामयतेसाठी पोषक आहार

संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे आणि भारताच्या प्रस्तावावर जगभरात त्याचा प्रचार केला आहे असे पोषक आहाराबाबत बोलताना मोदी यांनी नमूद केले. योग्य पोषणाद्वारे अनेक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते म्हणून पोषणाबाबत जागरूकता निर्माण करावी, असा आग्रह भारताने धरला. भारतात भरडधान्यांना सुपरफूड (परिपूर्ण आहार) म्हणून ओळखले जाते यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

पोषण आणि निरामयता 

निरोगीपणावर चर्चा करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की आजार नसणे म्हणजे व्यक्ती निरोगी आहे असे नाही आणि त्यांनी मुलांना निरोगीपणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात झोप महत्त्वाची आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तणाव व्यवस्थापनात निपुणता

तणाव व्यवस्थापनात निपुणता या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या समाजात दुर्दैवाने अशी कल्पना रुजली आहे की, 10वी किंवा 12वी सारख्या शालेय परीक्षांमध्ये उच्च गुण न मिळणे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त. यामुळे मुलांवर दडपण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वतःलाच आव्हान द्या

विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देत अभ्यासात चांगली तयारी करावी, असे पंतप्रधान म्हणाले. बरेच लोक स्वतः विरूद्ध स्वतः अशी लढाई लढण्याची हिमंत करत नाहीत, असेही ते म्हणाले.

नेतृत्वाची कला

बाह्य स्वरुपावरून नेत्याची व्याख्या करता येत नाही तर नेता तो असतो जो इतरांसमोर उदाहरण ठरेल असे नेतृत्व करतो, असे पंतप्रधानांनी एका विद्यार्थ्याने प्रभावी नेतृत्वाबद्दल टिप्सबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. हे साध्य करण्यासाठी, व्यक्तींनी स्वतःत बदल घडवले पाहिजेत, आणि त्यांच्या वागण्यातला हा बदल इतरांच्या दृष्टीस पडला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पुस्तकांच्या पलीकडे – 360 अंशात होणारी प्रगती

अभ्यासासोबत छंदांचा समतोल साधण्यासंदर्भात, शैक्षणिक अभ्यासक्रम हाच यशाचा एकमेव मार्ग आहे असा सर्वसाधारण समज असला तरीही, विद्यार्थी रोबोट नाहीत त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे आहे हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके वाचून पुढील वर्गात जाणे नव्हे तर शिक्षण सर्वसमावेशक वैयक्तिक वाढीसाठी आवश्यक आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

सकारात्मकता शोधणे

पंतप्रधानांनी उल्लेख केला की लोक अनेकदा त्यांना दिलेल्या सल्ल्याबद्दल विचार करतात—तो सल्ला का दिला गेला आणि तो त्यांच्या काही दोषांकडे निर्देश करतो का. ही मानसिकता इतरांना मदत करण्याच्या आपल्या क्षमतेस अडथळा आणते. त्याऐवजी, त्यांनी इतरांमधील चांगल्या गुणांची ओळख पटवण्याचा सल्ला दिला, जसे की एखाद्याला उत्कृष्ट गाणे येते किंवा एखादा नेहमी स्वच्छ व नीटनेटका पेहराव करतो. अशा सकारात्मक गुणांबद्दल चर्चा करावी, कारण हा दृष्टिकोन खरा रस दाखवतो आणि सुसंवाद निर्माण करतो.

आपल्यातील वेगळेपणा ओळखा

अहमदाबादमधील एका घटनेचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी सांगितले की एका मुलाला अभ्यासात लक्ष देत नसल्याने शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला जात होता. मात्र, त्याने टिंकरिंग लॅबमध्ये उत्कृष्ट कौशल्य दाखवले आणि रोबोटिक्स स्पर्धा जिंकली, ज्यातून त्याच्या अनोख्या प्रतिभेची झलक दिसून आली. पंतप्रधानांनी यावर जोर दिला की मुलांमधील वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभा आणि क्षमता ओळखून त्यांना विकसित करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

वर्तमानात जगा

पंतप्रधानांनी यावर भर दिला की सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आत्ताचा क्षण. तो एकदा निघून गेला की परत येत नाही, पण जर तो पूर्णतः जगला गेला तर तो आयुष्याचा एक भाग बनतो.  त्यांनी सजग राहण्याचे आणि प्रत्येक क्षणाची किंमत ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले, जसे की एखाद्या थंड आणि हळुवार झुळूक जाणवणे.

चिंता सामायिक केल्याने मिळणारे बळ

अभ्यास सांभाळताना चिंता आणि नैराश्याचा सामना कसा करावा या विषयावर बोलताना, मोदींनी सांगितले की नैराश्याची समस्या अनेकदा कुटुंबाशी असलेले नाते ढासळल्यामुळे सुरू होते आणि हळूहळू सामाजिक संपर्क कमी होतो.  त्यांनी अंतर्गत दुविधा मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या महत्त्वावर भर दिला, जेणेकरून त्या अधिक गंभीर होण्यापासून रोखता येतील.पंतप्रधानांनी पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले, जिथे कुटुंबातील सदस्यांशी खुलेपणाने संवाद साधल्यामुळे भावनिक दडपण कमी होण्यास मदत होते आणि मानसिक तणाव वाढत जात नाही.

तुमची आवड जोपासा

एखादे विशिष्ट करिअर निवडण्याबाबत मुलांवर असलेल्या पालकांच्या दबावाला पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पालकांच्या आपल्या पाल्याप्रती असलेल्या अपेक्षा या बहुतेकवेळा इतर मुलांशी केलेल्या तुलनेमुळे उद्भवतात, ज्यामुळे त्यांच्या अहंभाव आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. पालकांनी आपल्या मुलांना प्रत्येक ठिकाणी एक आदर्श म्हणून दाखवण्यापेक्षा  त्यांच्यातील सामर्थ्यांवर प्रेम करा आणि स्वीकारा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

प्रत्येक मूल वेगळे असते

परीक्षांच्या काळात मुलांची तब्येत उत्तम राहावी या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की प्राथमिक समस्या विद्यार्थ्यांमध्ये कमी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जास्त आहे. अनेक पालक मुलांना कलेसारख्या क्षेत्रात आवड असूनही  अभियांत्रिकी किंवा वैद्यक यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात करिअर करण्यासाठी दबाव आणतात, असे पंतप्रधान म्हणाले. या सततच्या दबावामुळे मुलांचे आयुष्य तणावपूर्ण बनत जाते. पालकांनी आपल्या मुलांना समजून घ्यावे, मुलांची आवड आणि क्षमता ओळखाव्यात, त्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

स्वयंप्रेरणा

स्वयंप्रेरणा या विषयावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की मुलांनी कधीही स्वतःला एकटे वाटून घेऊ नये, एकांतात राहू नये ,विचारांची देवाणघेवाण करावी तसेच आपले कुटुंबीय आणि वरिष्ठांकडून प्रेरणा घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी जोर दिला.

अपयश हे एकप्रकारचे इंधनच आहे

यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अपयशावर कशी मात करावी  या विषयावर देखील मार्गदर्शन केले. 30 ते 40 टक्के विद्यार्थी दहावी किंवा बारावीत अनुत्तीर्ण झाले म्हणजे आयुष्य संपले असे नव्हे. आयुष्यात यशस्वी व्हायचे की केवळ शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी व्हायचे हे ठरवणे खूप महत्त्वाचे असते असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अपयशाला शिक्षक बनवायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला.

तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणे

आपण सगळेजण विशेषत: तंत्रज्ञानाने व्यापलेल्या आणि तंत्रज्ञानाचाच प्रभाव असलेल्या युगात जगत आहोत, आणि त्यामुळेच आपण सर्वजण भाग्यवान असल्याच्या वास्तवाची जाणिवही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना करून दिली. अशा काळात आपल्याला तंत्रज्ञानाला घाबरून त्यापासून दूर जाण्याची गरज नाही, तर  त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीने, आपण आपला वेळ अनुत्पादक कामांवर खर्च करतो की आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करतो हे ठरवले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

निसर्गाची जोपासना

आपल्या या संवादात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी हवामान बदलाच्या विषयावर देखील चर्चा केली. युवा पिढीने हवामान बदलाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. जगभरातील बहुतांश विकास कामांमुळे शोषणाची संस्कृती उदयाला आली झाली आहे, या संस्कृतीशी जोडलेले लोक पर्यावरण रक्षणापेक्षा वैयक्तिक लाभालाच सर्वोच्च प्राधान्य देतात असे पंतप्रधान म्हणाले.

स्वतःचे हरित नंदनवन विकसित करणे

आपल्या या संवादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना स्वत:ची झाडे लावण्यासाठीही प्रोत्साहित केले. आपण लावलेल्या झाडांना कशारितीने पाणी द्यावे याबद्दलचे व्यावहारिक उपायही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

Trending

Exit mobile version