गोवा खबर

गोव्यात सुगम्य यात्रेला सुरवात

Published

on

Spread the love
  • सार्वजनिक स्थळांची दिव्यांगजनांसाठीची प्रवेशसुलभता मूल्यांकन मोहीम म्हणजे सुगम्य यात्रा

गोवा खबर : राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता सुगम्य यात्रेला अधिकृतपणे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव  ताहा हाजिक आणि राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक उपस्थित होत्या.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे आयोजित हा राष्ट्रीय उपक्रम सध्या देशभरात सुरू आहे. सुगम्य यात्रेचा उद्देश दिव्यांगजनांच्या विविध सुलभतेच्या गरजांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सुलभतेबाबत भागधारकांना त्यांचे संवैधानिक आणि कायदेशीर अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करणे हा आहे.

सार्वजनिक स्थळांची प्रवेशसुलभतेबाबतचे मूल्यांकन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि दिव्यांगजन सक्षमीकरण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केले. यामध्ये अभिजित मुरुगकर, विशांत नागवेकर, महादेव सावंत, प्रकाश कामत, प्रशांत राऊत, अनुप मापारी, रोहन वळवईकर, रितेश वायंगणकर, प्रसाद जोशी, जोसेफिना फर्नांडिस, मुस्कान शेख, दुर्गा नाईक, गौरीश नागवेकर आणि लखन आनंदानी यांचा सहभाग आहे.

फळदेसाई म्हणाले, सुगम्य यात्रा ही केवळ एक मोहीम नाही. ही यात्रा म्हणजे सर्वांसाठी समावेशक आणि सुलभ गोवा निर्माण करण्याच्या दिशेने सुरू झालेली एक चळवळ आहे. सार्वजनिक स्थळांच्या प्रवेशसुलभतेचे मूल्यांकन करून आणि या प्रवेशसुलभतेमध्ये सुधारणा करून, आम्ही दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी ठोस पावले उचलत आहोत. कोणीही मागे राहू नये आणि सर्वांना संधी मिळावी या उद्देशांची निश्चिती करण्यासाठी एक समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी या उपक्रमातून प्रतिबिंबित होत आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रत्येक नागरिक पूर्णपणे आणि स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकेल अशी वातावरणनिर्मिती शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि समाजाच्या पाठिंब्याने निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

जिथे प्रवेशसुलभता ही बाब काल्पनिक नसून मूलभूत अधिकार आहे असा सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल सुगम्य यात्रेच्या माध्यमातून टाकण्यात आले आहे. दिव्यांगजनांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करणे, आवश्यक परिवर्तन घडवणे आणि गोव्यातील सार्वजनिक स्थळे खऱ्या अर्थाने सर्वांना उपलब्ध आहेत याची खात्री करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आखण्यात आले आहे. शासन, संस्था आणि नागरिक असे सर्व घटक एकत्रितपणे काम करून आपण दिव्यांगजनांसाठी प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि समान संधी देणारे भविष्य घडवू शकतो, असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला.

या यात्रेदरम्यान राजधानी पणजी शहरातील विविध इमारती, सार्वजनिक स्थळे, उद्याने, मॉल आणि रेस्टॉरंट आदी ठिकाणांचे प्रवेशसुलभता मूल्यांकन करण्यासाठी गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य डॉ. लिओन मोरेनास यांच्या नेतृत्वाखाली ६० विद्यांर्थ्यांचे १२ गट तयार करण्यात आले आहेत. तसेच गोव्याच्या सर्व तालुक्यांमधील सार्वजनिक इमारतींचे मूल्यांकन करण्यासाठी ५० क्षेत्रीय सहाय्यक आणि समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे १० गट तयार करण्यात आले आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, मुंबईतील अली यावर जंग राष्ट्रीय भाषण आणि श्रवण दिव्यंगत्व संस्था (दिव्यांगजन) [AYJNISHD (D)] अंतर्गत कर्णबधिर व्यक्तींचा समावेश असलेल्या चार गटांनी गोवा विद्यापीठ संकुलाचे व्यापक परिक्षण केले. तर, ज्ञानवर्धिनी दिव्यांग प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश असलेल्या पाच गटांकडे दक्षिण गोव्यातील ठिकाणांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी वास्को शहर आणि परिसरातील विविध इमारती आणि सार्वजनिक ठिकाणांचे प्रवेशसुलभता मूल्यांकन पूर्ण केले.

दिवसअखेर या गटांनी राज्यातील १००हून अधिक इमारती व सार्वजनिक स्थळांचे मूल्यांकन यशस्वीपणे पूर्ण केले.

सुगम्य यात्रा खालील प्रमुख उद्दिष्टांसह सुरू करण्यात आली आहे :

  • सार्वजनिक स्थळांचे प्रवेशसुलभतेविषयक मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक कौशल्य, आवड आणि जबाबदारी असलेल्या प्रतिनिधींचे जाळे तयार करणे.
  • सांख्यिकी संकलन आणि विश्लेषणासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ज्यामुळे सार्वजनिक कल्याण साधणे शक्य होईल.
  • सार्वजनिक इमारती आणि स्थळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या प्रभारी, पदाधिकाऱ्यांमध्ये प्रवेशसुलभतेविषयक समस्या आणि समावेशक पायाभूत सुविधांचे महत्त्व याबाबत संवेदनशीलता वाढवणे.

राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी प्रवेशसुलभता आणि समावेश सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ही सुगम्य यात्रा ठरणार आहे.

Trending

Exit mobile version