आयआरएफ गोवा स्ट्रीट सर्किटला पर्यटन खात्याकडून मंजुरी; राज्याच्या अर्थव्यवस्थेला तसेच जागतिक पर्यटन विकासाला उपक्रम ठरणार पूरक, जॉन अब्राहम करतोय गोवा एसेसचे नेतृत्व
गोवा खबर: भारतातील मोटरस्पोर्ट क्षेत्राला नवी भरारी देण्याच्या उद्देशाने रेसिंग प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड (आरपीपीएल) बहुप्रतिक्षित इंडियन रेसिंग फेस्टिव्हल २०२५ (आयआरएफ)सह सज्ज झाली आहे. इंडियन रेसिंग लीग (आयआरएल) आणि एफआयए फॉर्म्युला ४ इंडियन चॅम्पियनशिप (एफ४आयसी) या दोन उत्कंठावर्धक स्पर्धा २४ ऑगस्ट २०२०५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. गोवा स्ट्रीट सर्किटला गोवा पर्यटन विभागाकडून मान्यता मिळाल्यामुळे आता भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेसरना आकर्षित करणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून उत्कंठावर्धक स्पर्धांचा अनुभव गोवा राज्याला मिळणार आहे.
गोव्यात जागतिक दर्जाची स्ट्रीट रेसिंग आणून, एका पर्यटन स्थळासह जागतिक क्रीडा स्पर्धांसाठी एक उत्तम केंद्र म्हणून राज्याची ओळख बनवण्याचे आणि त्याद्वारे क्रीडा पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आखण्यात आले आहे. महोत्सवाच्या रेसिंग वेळापत्रकामध्ये वर्षभरात गोवा स्ट्रीट सर्किटसह हैदराबाद आणि चेन्नई अशा तीन स्ट्रीट सर्किटचा समावेश झाला आहे.
या स्पर्धेमध्ये सहा शहरांचे संघ सहभागी होणार आहेत, हे संघ असे: जेए रेसिंग अंतर्गत बॉलीवूड आयकॉन जॉन अब्राहमच्या नेतृत्वाखाली गोवा एसेस, क्रिकेट दिग्गज सौरव गांगुली यांच्या मालकीचा कोलकाता रॉयल टायगर्स, पुरस्कार विजेते अभिनेता नागा चैतन्य यांचे पाठबळ लाभलेला हैदराबाद ब्लॅकबर्ड्स, बॉलीवूड स्टार अर्जुन कपूर यांचे पाठबळ मिळालेला स्पीड डेमन्स दिल्ली, बंगळुरू स्पीडस्टर्स आणि चेन्नई टर्बो रायडर्स.
या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि भारतीय स्पर्धकांचे उत्कट मिश्रण ग्रीडवर पाहायला मिळेल. यामध्ये, अल्वारो पॅरेंटे (पोर्तुगाल), फॅबियन वोलवेंड (लिक्टेंस्टाईन), लॉरा कॅम्प्स (स्पेन), गॅब्रिएला जिल्कोवा (झेक प्रजासत्ताक), राउल हायमन (ब्रिटन), नील जेनी (स्वित्झर्लंड), अॅलिस्टर यूंग (मलेशिया) आणि जॉन लँकेस्टर (ब्रिटन) यांचा समावेश आहे. तर भारतातील सोहिल शाह, संदीप कुमार, मोहम्मद रायन, निखिल बोहरा, अनिंदित रेड्डी, रिशन राजीव, अखिल रवींद्र, आकाश गौडा, काइल कुमारन, रुहान अल्वा आणि साई संजय यांचाही स्पर्धकांत समावेश असेल.
महिला समावेशनासाठीही आयआरएल कटिबद्ध असून, लॉरा कॅम्प्स, गॅब्रिएला जिल्कोवा, फॅबियन वोलवेंड, अँजेलिक डेटाव्हर्नियर, कॅटलिन वूड आणि श्रिया लोहिया यासारख्या महिला रेसर्स सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करणार आहेत. २०२३ मध्ये, सारा मूरने आयआरएफमध्ये पहिली महिला विजेती म्हणून इतिहास रचला होता आणि आपल्या यशातून मोटरस्पोर्टला कोणत्याही कुंपणाच्या मर्यादा घालता येत नसल्याचे दाखवून दिले होते.
नेतृत्वाची दृष्टी आणि संघ उत्साह
आरपीपीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अखिलेश रेड्डी:
“भारतीय रेसिंग फेस्टिवल-२०२५ हा उपक्रम भारतातील मोटरस्पोर्ट्सची पुनर्परिभाषा करण्यासाठी सज्ज झाला असून, पूर्वी कधीही न अनुभवलेल्या वेग, कौशल्य आणि भव्यतेच्या सीमा विस्तारित करणार आहे. यंदाच्या मोसमामध्ये ऊर्जा, ऊर्मी आणि जागतिक दर्जा या वैशिष्ट्यांसह जगप्रसिद्ध असलेल्या गोव्यामध्ये ही अतिशय उत्कंठावर्धक अशी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक व आनंदित आहोत. मोटरस्पोर्ट आता भारतामध्ये केवळ विशेष वर्गाचा खेळ म्हणून मर्यादित राहिलेला नाही; तर इंडियन रेसिंग लीग आणि एफआयए फॉर्म्युला ४ इंडियन चॅम्पियनशिपसह, आम्ही प्रतिभेचा विकास करणे, जागतिक मान्यता मिळवून देणे आणि आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्टच्या नकाशावर भारताचे स्थान अधिक बळकट करणे अशी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक उत्तम परिसंस्था घडवण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. आयआरएफ ही केवळ एक स्पर्धा नाही- ती एक क्रांती आहे आणि गोवा ही चळवळ पुढील स्तरावर नेण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे.”
बॉलीवूड सुपरस्टार आणि जेए रेसिंग अंतर्गत गोवा एसेस संघाचे मालक जॉन अब्राहम:
“मोटरस्पोर्ट हा उपक्रम अगदी गोव्याप्रमाणेच एक रोमांचक, थरारक, उत्कंठावर्धक, वेगवान आणि जल्लोष घडवणारा असा उपक्रम आहे. होमसर्किटवरच गोवा एसेस हा गोव्याचा संघ सादर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. गोवा स्ट्रीट रेस ही या हंगामातील सर्वात रोमांचक शर्यतींपैकी एक असेल आणि रस्त्यावर ऊर्जा, उत्साह, वेग आणि थरार अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
इंडियन रेसिंग फेस्टिव्हल बद्दल
इंडियन रेसिंग फेस्टिव्हल (IRF) हा भारतातील प्रमुख मोटरस्पोर्ट इव्हेंट आहे जो देशाच्या वाढत्या मोटरस्पोर्ट चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. IRFच्या बॅनरखाली, दोन प्रमुख चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात:
• इंडियन रेसिंग लीग (IRL): भारतातील एकमेव फ्रँचायझी-आधारित फोर-व्हील रेसिंग लीग आणि जगातील पहिली जेंडर-न्यट्रल मोटरस्पोर्ट चॅम्पियनशिप आहे. सहा शहरांच्या संघांसह, IRL समावेशकता आणि स्पर्धात्मक भावनेला प्रोत्साहन देते.
• फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप (F4IC): ही FIA-प्रमाणित, ओपन-व्हील, सिंगल-सीटर रेसिंग स्पर्धा आहे. कार्टिंगपासून प्रारंभ केलेल्या तरुण चालकांना सिंगल-सीटर रेसिंगकडे नेणाऱ्या शिडीवरील पहिले पाऊल म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. FIA सुपर लायसन्स पॉइंट्स मिळाल्याने, भारतीय ड्रायव्हरना आता परदेशात जाण्याऐवजी देशामध्ये करिअर घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.