गोवा खबर

‘बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा’ मोहीम देशभर राबवणार : हिंदू जनजागृती समिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशभरात अनेक राज्यांत बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या, तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणार्‍यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, ‘आसाम’सारखी संपूर्ण देशाची स्थिती होण्याआधी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी केली.

ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे ३ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या दृष्टिने जनजागृतीसाठी संपूर्ण देशभरात आंदोलने, मोर्चे, स्वाक्षरी अभियान, पोलिस तक्रारी दाखल करणे असे नियोजन सुद्धा आम्ही करणार आहोत, हे कोचरेकर पुढे म्हणाले. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर उपस्थित होते.

वर्तक म्हणाले, देशभरात अनेक शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. मुंबई आणि नवी मुंबई मध्ये ८ ते १० लाखाहून अधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. अशीच स्थिती देशभरात आहे. खरेतर ही आकडेवारी म्हणजे हिमनगाचे टोक आहे. बांगलादेशी घुसखोर ही समस्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे.

पाटकर म्हणाले, ‘बांगलादेशी घुसखोर देशातील रोजगार हिसकावून घेत आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीतील चिपळूण १३ बांगलादेशी नागरिकांपैकी ३ जणांनाच अटक करण्यात आली; त्यातही पोलिसांनी हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना जामीन मिळाला, ही अतिशय गंभीर बाब आहे. देशाची न्यायव्यवस्था बांगलादेशी घुसखोरांना जामीन देते, ही न्यायदेवतेची थट्टा आहे.

सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. उद्या हेच बांगलादेशी घुसखोर वाढत जाऊन भारतात छोटे बांगलादेश निर्माण करून तेथील हिंदूंवर असेच अत्याचार करतील, ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर या प्रकरणी सरकारने आताच कठोर पावले उचलायला हवीत, असे कोचरेकर म्हणाले.

Trending

Exit mobile version