गोवा खबर : एमव्हीआर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराच्या निष्काळजी कारभारामुळे गोमंतकीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने केला आहे. झुआरी IAV प्रा. लि. च्या इंधन वाहिनीला झालेल्या गंभीर नुकसानीनंतर काँग्रेसने भाजप सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले की, “एमव्हीआर इन्फ्राची ख्याती निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी आणि भ्रष्टाचारासाठी आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे झुआरी IAV च्या इंधन वाहिनीला हानी पोहोचली आणि हजारो लोकांचा जीव धोक्यात आला. एक मोठा स्फोट होण्याची शक्यता होती, मात्र सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.”
झुआरी IAV प्रा. लि. च्या टर्मिनल मॅनेजरने एमव्हीआर इन्फ्राला अनेक वेळा तंबी दिली होती, असे स्पष्ट असूनही, कंपनीने निष्काळजीपणा सुरूच ठेवला. यावरून काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, “एमव्हीआर इन्फ्राला भाजप सरकारचे संरक्षण आहे. त्यामुळेच कोणतीही कारवाई होत नाही.”
काँग्रेसची सरकारकडे प्रमुख मागणी:
- एमव्हीआर इन्फ्राला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करून सर्व कंत्राटे रद्द करावीत.
- कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
- त्यांच्या निष्काळजी कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी.
- भाजप नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी एमव्हीआरला दिलेले संरक्षण तात्काळ थांबवावे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा गोमंतकीय जनता आणि काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. भाजप सरकारने भ्रष्टाचारी कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.