9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार राष्ट्रीय टपाल सप्ताह

0
1045

पणजी: 9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान गोवा टपाल विभागातर्फे ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती गोवा प्रदेशाचे पोस्ट मास्टर जनरल डॉ. एन. विनोदकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 9 ऑक्टोबर हा दिवड जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला जोडूनच 14 ऑक्टोबरपर्यंत पुढील सहा दिवसात अनुक्रमे बँकींग दिन, टपाल वीमा दिन, टपाल तिकीट संग्रह दिन, उद्योग विकास दिन आणि पत्र व्यवहार दिन म्हणून साजरे केले जाणार आहेत. सर्व विद्यार्थी वर्ग, नागरिक यांना टपाल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवांबाबत माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये जागरूकता वाढावी, हा या सप्ताहाचा उद्देश आहे, असे डॉ. विनोदकुमार यांनी याप्रसंगी सांगितले.

 

यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात हे कार्यक्रम होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून पणजी मधीलमॅकिनेज पॅलेस येथे टपाल तिकीट संग्रहाचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने ‘आयुष टपाल तिकीट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात अधिकाधिक शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोवा विभागाच्या वरिष्ठ टपाल कार्यालय अधिक्षक अर्चना गोपीनाथ यांनी पत्रकार परिषदेत केले.

 

आजच्या जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने भारतीय टपाल सेवेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय ट्रॅक पॅकेट’ सेवेचे उद्घाटन होत आहे. या द्वारे सुरुवातीला ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, हॉंग-कॉंग, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपाईन्स,सिंगापूर, साऊथ कोरिया, थायलंड, व्हिएतनाम या एशिया-पॅसिफिक देशांमध्ये एक रास्त व्यापारी सेवा दिली जाणार आहे. 2 किलो पर्यंतचे सामान या सेवेद्वारे वरील देशांमध्ये टपाल विभागाकडून पोहचविण्यात येईल, अशी माहिती डॉ. विनोदकुमार यांनी दिली.

 

‘तंत्रज्ञान सक्षम, आत्मनिर्भर बाजारपेठ’ या स्वरुपात उभे राहण्यासाठी टपाल खात्याकडून 4909 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी माहिती तंत्रज्ञान प्रकल्प देशभरात राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशभरातील सुमारे 1 लाख 55 हजार टपाल कार्यालये संगणीकृत करण्यात आली आहेत. याचाच भाग म्हणून गोवा राज्यातही टपाल खात्याकडून होत असलेल्या विविध कामांचा आढावा देखील यावेळी डॉ. विनोदकुमार यांनी घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्यानी सर्वप्रथम राज्यातील सर्व 257 टपाल कार्यालयातील संगणकीकरण पूर्ण केले आहे. यामध्ये आर्थिक सेवा एकीकरण, कोर प्रणाली एकीकरण आणि ग्रामीण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या तीन घटकांचा समावेश आहे.

 

आर्थिक सेवा एकीकरण अंतर्गत पारंपारिक टपाल बचत बँकिंग सेवा कोर बँकिंग सेवेत रुपांतरीत करण्यात आली. जसे की गोवा राज्यातील 104 टपाल कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयातून व कोणत्याही वेळी, आता ग्राहकांना आपल्या बचत खात्याची सेवा घेता येईल. याशिवाय पणजी, म्हापसा, पोंडा आणि मडगाव येथील टपाल कार्यालयांमध्ये एटीएम सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खातेधारकांना रूपे डेबिट कार्ड देण्यात आली आहेत. याची पुढील पायरी म्हणजे लवकरच ग्राहकांना नेटबँकिंग व मोबाईल बँकिंगची सुविधा देखील पुरविण्यात येणार आहे.

 

कोर प्रणाली एकीकरण अंतर्गत सर्व टपाल कार्यालये तसेच सेवा संगणकीकरणाद्वारे अंतर्गतरित्या जोडले गेले आहेत. या अद्ययावत बदलामुळे टपाल ग्राहकांना संकेतस्थळ व कॉल सेंटरची सेवा घेता येईल.

ग्रामीण माहिती संप्रेषण तंत्रज्ञान अंतर्गतगोव्यातील 153 पैकी 138 ग्रामीण टपाल कार्यालयांमध्ये सौर उर्जेवर चालणारी पोर्टेबल यंत्रे देण्यात आली आहेत. ज्यामुळे संगणकाशिवाय देखील टपाल खात्याशी संबंधित व्यवहार करता येणे शक्य झाले आहे. ही हातात मावणारी यंत्रे संगणकाप्रमाणेच काम करतात. या यंत्रांमध्ये कॅमेरा, प्रिंटर बायोमेट्रिक स्कॅनर अशा सर्व सुविधा आहेत. या यंत्राच्या माध्यमातून टपाल कार्यालय एखाद्याच्या घरापर्यंत जाऊ शकते. सेवेतील गुणवत्ता वाढविणे हा मुख्य उद्देश यामागे आहे.