पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान दूरध्वनी संवाद

0
745

 

 

गोवा खबर:कोविड-19 महामारी आणि त्याचे जागतिक आरोग्यावर तसेच अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले.

अमेरिकेत या महामारीत दगावलेल्या लोकांप्रती पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि या आजारानी बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली.

दोन्ही देशांमधील विशेष संबंधांवर जोर देताना पंतप्रधानांनी या जागतिक संकटावर एकत्रित मात करण्यासाठी अमेरिकेसह भारताच्या दृढ ऐक्याचा पुनरुच्चार केला.

कोविड-19 विरोधात प्रभावीपणे लढा देण्यासाठी उभय देशातील परस्पर सहकार्याची ताकद पणाला लावण्याची दोन्ही नेत्यांनी तयारी दर्शविली.

या महामारीमुळे भारत आणि अमेरिकेत आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत उभय नेत्यांनी आढावा घेतला.

या कठीण काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग आणि आयुर्वेद (पारंपारिक भारतीय वनौषधी उपचारपद्धती) यासारख्या पद्धतींचे महत्त्व देखील या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 जागतिक महामारीच्या काळात दोन्ही देशातील अधिकारी परस्परांच्या निकट संपर्कात राहण्याविषयी उभय देशाच्या नेत्यांनी या संवादात मान्यता दिली.