मोलेला चक्री वादळाचा फटका,गोवा-बेळगाव हायवे 6 तास ठप्प

0
1527

गोवा खबर:धारबांदोडा तालुक्यातील मोले पंचायत क्षेत्रात झालेल्या चक्रीवादळामुळे गोवा-बेळगाव राष्ट्रीय महमार्ग तब्बल सहा तास बंद होता.काल सायंकाळी  झालेल्या चक्रिवादळानंतर रात्री उशिरापर्यत महामार्गावरील झाडे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

मोले येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कासावली ते सुकतळे रस्तावर सायंकाळी केवळ दोन मिनिटामध्ये झालेल्या चक्रीवादळात सुमारे 50 ते 60 वृक्ष कोसळल्याने शेकडो वाहने अडकून पडली.  फोंडा अग्निशामक दल व सावर्डे अीग्नशामक दलाने तातडीने सहकार्य केल्याने परीस्थिती आवाक्यात आणली. महामार्गावर तसेच अन्य ठिकाणी मोठया प्रमाणात वृक्ष कोसळल्याने संपुर्ण कुळे, साकोर्डा, धारबांदोडा भागात वीज पुरवठा खंडित झाला.

धारबंदोडा तालुक्यासह  मोले भागात पडझडीच्या अनेक घटना नेंद झाल्या. पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोले भागात मोठय़ाप्रमाणात पडझड झाली. तसेच इतर भागांना या वादळाचा तडाखा बसला. त्यात अनेक घरांवर वृक्ष कोसळल्याने लाखो रुपयांची हानी झाली. फेंडा व सावर्डे अग्निशामक दलाने सायंकाळपासून उशिरारात्रीपर्यत मदतकार्य सुरू होते. तसेच बऱयाचठिकाणी वीजखांब कोलमडून पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला. वादळाच्या तडाख्यात काळोखी रात्रीत मोबाईल सेवाही टप्प झाल्याने कुळेवासियांचे जनजीवन विस्कळीत झाले.

मोले येथील अत्रेय स्पाईसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे काही परीसरातील घरावर झाड कोसळल्याने छप्पर व इतर सामानाची बरीच मोडतोड झाली. कासावली येथील सरकारी प्राथमिक विद्यालयावर वृक्ष कोसळल्याने कौले आतील बाकाडयावर पडली. तसेच वीजेच्या साहित्याची हानी झाली. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु होते.

घटनेची दखल घेत धारबांदोडयातील उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच आपत्कालीन सेवेसाठी नेमण्यात आलेले सरकारी अधिकारी घटनास्थळी न पोचल्याने संताप व्यक्त केला जात होता.मोले ते सुकतळे मार्ग वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद झाल्याने दुचाकीची व अन्य हलक्या वाहने मोले-साकोर्डा-धारबांदोडा मार्गे वळविण्यात आली.