राष्ट्रपतींच्या स्वागत सोहळय़ाची जय्यत तयारी

0
1169

 गोवा खबर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  स्वागत सोहळय़ाची तयारी पूर्ण झाली असून ते  7 जुलै रोजी सकाळी गोव्यात पोहोचणार आहेत. दाबोळी विमानतळावरून ते थेट शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयम बांबोळी येथे गोवा विद्यापीठाच्या पदवीदान  समारंभास उपस्थित राहतील.

माहिती व प्रसिद्धी खाते संचालक टी. एस. सावंत म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर कोविंद यांची ही पहिलीच गोवा भेट असल्यामुळे त्यांचे राज्य सरकारतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. हा स्वागत सोहळा एनआयओ सभागृहात  होणार असून त्याची वेळ सायंकाळी 5 ते 6 अशी आहे. गोवा विद्यापीठ पदवीदान सोहळा आणि स्वागत समारंभ असे सध्या तरी त्यांचे दोनच अधिकृत कार्यक्रम असून रविवार 8 जुलैचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही.

स्वागत सोहळा हा  फक्त  निमंत्रितांसाठीच असून त्याकरीता निमंत्रक पत्रिका मर्यादित व प्रमुख लोकांनाच दिल्या जाणार आहेत. त्यात आमदार, मंत्री, सरपंच, पंच, नगरसेवक, तसेच सर्व स्थानिक स्वरांज्य संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. स्वागत सोहळा जनतेसाठी खुला नाही. निमंत्रण असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. राष्ट्रपतींचे गोवा भेटीचे वेळापत्रक अद्याप राष्ट्रपती भवनातून पक्के झाले नसल्याचे ते म्हणाले.