522 रशियन पर्यटकांना घेऊन जंबो जेट गोव्यात दाखल

0
970
 गोवा खबर:गोव्यातील पर्यटन हंगाम आता जोर धरु लागला आहे.4 ऑक्टोबर रोजी 218 रशियन पर्यटकांना घेऊन हंगामातील पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल झाले होते.आज तब्बल 522 रशियन पर्यटकांना घेऊन पहिले जंबो जेट विमान गोव्यात दाखल झाले आहे.

गोव्यात दरवर्षी 70 लाखांहुन अधिक देशी आणि विदेशी पर्यटक भेट देत असतात.विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याने पर्यटन व्यावसायिक त्यांची वाट पाहत असतात.
यंदा हंगामातील पहिले चार्टर विमान 4 ऑक्टोबर रोजी 218 रशियन पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल झाले होते.त्यानंतर आज सकाळी साडे आठच्या सुमारास रोसिया एयरलाइन्सचे एफव्ही 5883 हे पहिले जंबो जेट विमान गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले.
कॉनकॉर्ड एक्सोटिक वॉयाजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटिड कंपनीने पहिल्या जंबो जेट मधून 522 रशियन पर्यटक गोव्यात आणले आहेत,अशी माहिती कंपनीचे उपाध्यक्ष शेख इस्माइल यांनी दिली आहे.
यंदा पहिले जंबो जेट यायला आठ दिवसांचा उशीर झाला असला तरी मे अखेर पर्यंत आठवडयाला चार याप्रमाणे रशिया मधून पर्यटकांना घेऊन चार्टर विमाने येणार असल्याची माहिती,इस्माइल यांनी दिली.
डिसेंबर महीना गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी खास असतो.सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक गोव्यात येत असतात.डिसेंबर मध्ये रशिया मधून येणाऱ्या चार्टर विमानांची संख्या सर्वाधिक असेल अशी माहिती इस्माईल यांनी दिली आहे.