कॉंग्रेसचे पेट्रोल दरवाढी विरोधात घोडागाडी आंदोलन

0
1525

गोवा खबर:काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी पणजीत टांग्यातून प्रवास करून इंधन दरवाढीचा निषेध केला. काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत टांग्यातून  जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. पेट्रोल व डिझेल जीएसटीअंतर्गत आणावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल आम्हाला स्वस्त हवे अशी घोषणा देत काँग्रेस हाऊसकडून ही फेरी सुरु झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नेत्यांनी दरवाढ कमी करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, इंधन दराचा उच्चांक करण्याचा विक्रम भाजप आघाडी सरकारने केला आहे. चार वर्षात सरकारने 10 लाख कोटी रुपये कराच्या रुपाने जनतेकडून घेतले तरी इंधनाचे दर नियंत्रणात का ठेवले जात नाहीत. गेल्या चार वर्षात पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क 211 टक्क्यांनी वाढवले आहे. डिझेलवर 443 टक्के उत्पादन शुल्क आहे. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात उतरत असताना देशातील इंधनाचे दर उतरत नव्हते मग आता ते दर चढत असताना येथील दर का वाढवले जातात. काँग्रेसने जनतेला घोडागाडीवरून कारगाडीत आणले भाजपने कारगाडीतून जनतेला घोडागाडी, सायकलवर ढकलले आहे.

गोव्यात  शेजारील राज्यांपेक्षा पेट्रोलचे दर स्वस्त

गोव्यात ७१.३९ रुपये प्रतिलीटर असा पेट्रोलचा दर आहे. महाराष्ट्रातील सावंतवाडीत ८६.३० रुपये प्र‌तिलीटर दर आहे. सुमारे १५ रुपये प्रतिलीटर असा गोवा व महाराष्ट्रातील पेट्रोलच्या दरातील फरक आहे. कर्नाटकात कारवारमध्ये पेट्रोलचा दर ७९.८० रुपये प्रतिलीटर असा आहे. गोवा वा कर्नाटकातील दरामध्ये ८.५० रुपये एवढा फरक आहे.

गोव्यात डिझेलचा दर ६९.७५ रुपये प्रतिलीटर एवढा आहे. महाराष्ट्रातील सावंतवाडीत ७३ रुपये, तर कारवारमध्ये ७०.७२ रुपये प्रतिलीटर आहे. डिझेलच्या दरात मोठा फरक नसला तरी पेट्रोलच्या दरात ८.५० ते १५ रुपयांपर्यंत फरक असल्यामुळे गोव्यात पेट्रोलचा दर कमी करण्याचा प्रस्ताव नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.