49 व्या इफ्फीच्या उद्धाटन सोहळयाला अक्षय कुमार लावणार हजेरी

0
1158
गोवा खबर:20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान  आयोजित 49 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या(इफ्फी) उद्घाटन सोहळा सोहळयाला बॉलीवुड स्टार अक्षय कुमार  उपस्थित असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ‘द आस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने होणार आहे.अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या इफ्फीची जय्यत तयारी सुरु असून राजधानी पणजी मध्ये सजावटीची कामे अंतिम टप्प्यात पोचली आहेत.
  चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक व महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी काल पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इफ्फी संदर्भात माहिती दिली.
 यावेळी इफ्फीचे ओएसडी सी. सेन्थील राजन, गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक, गोवा मनोरंजन सोसायटीच्या व्यवस्थापक मृणाल वाळके उपस्थित होत्या.
यंदाच्या चित्रपट महोत्सवात 68 देशातील 212 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपटातून विविधतेचे दर्शन घडविले जाणार आहे. तसेच यंदाचा कंट्री फोकस हा इस्त्रायलवर असेल तर स्टेट फोकस झारखंडवर असणार आहे.
 विशेष म्हणजे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार इस्त्रायलचे डॅन वॉलमन यांना देण्यात येणार आहे. एस्पर्न पेपर्सच्या प्रीमीयरवेळी चित्रपटाचे अभिनेते जोनाथन हेय मेयर्स, अभिनेत्री गोल्डन ग्लोब विजेत्या ज्योईली रिचर्डसन, अभिनेत्री मॉर्गन पोलान्सकी, निकोलस हॉव, ज्युलियन लॅडीएस उपस्थित राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांचा समावेश आहे. त्यात तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. स्पर्धा विभाग 22 देशांनी निर्मित आणि साहाय्य निर्मित केलेले चित्रपट पहायला मिळणार आहेत.
‘फेस्टीव्हल केलियोडोस्कोप’ विभागात विचारवंतांनी गौरवलेले 20 आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
जागतिक पॅनोरमा विभागात 67 चित्रपट असून हे चित्रपट यंदाच्या महोत्सवासाठी निवडण्यात आले आहेत. या विभागात 4 जागतिक प्रीमीयर, 2 आंतरराष्ट्रीय प्रीमीयर, 15 आशिया प्रीमीयर आणि 60 भारतीय प्रीमीयरचा समावेश आहे. यंदा या विभागात 15 असे चित्रपट आहेत जे ऑस्करपुरस्कारासाठी पोहचले होते.
यंदाच्या महोत्सवात इंगमर बर्जमॅनवर रेट्रोस्पेक्टीव्ह विभाग असून यंदा बर्जमन यांची शंभरावी जयंती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्त त्यांचे 7 चित्रपट या विभागातून दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय मेरी नायरेरोड यांनी दिग्दर्शित केलेला ‘बर्जमन आयलँड’या लघुपटाचा यात समावेश आहे. रेट्रोस्पेक्टीव्ह विभागाचे उद्घाटन दि. 21 रोजी ‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’ या चित्रपटाने होणार आहे.
प्रत्येक वर्षी विविध देशावर महोत्सव आधारित असतो. यंदाचा कंट्री फोकस इस्त्रायल असून कन्स्युलेट जनरल ऑफ इस्त्रायल यांच्या सहकार्याने दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. कंट्री फोकस विभागाचा शुभारंभ अवि नेशर दिग्दर्शित ‘द अदर स्टोरी’ या चित्रपटाने होणार आहे. याशिवाय इंडो- इस्त्रायली को प्रॉडक्शन या विषयावर  22 नोव्हेंबर रोजी परिसंवाद होणार आहे.
स्टेट फोकस विभागात झारखंड राज्याची निवड करण्यात आली आहे. तसेच झारखंड दिन 24 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यावर्षी 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमामध्ये 22 फिचर फिल्म तर 4 मेनस्ट्रीम चित्रपट आणि 21 नॉन फिचर फिल्म दाखविण्यात येणार आहेत. इंडियन पॅनोरामामध्ये फिचर फिल्मचा शुभारंभ शाजी करुण दिग्दर्शित ‘ओलु’ याने होणार आहे.
यंदा युनेस्को गांधी मेडलसाठी दहा चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मास्टरक्लास आणि इन कर्न्व्हसेशन विभागात प्रसून जोशी, डॅन वोल्मन, श्रीकर प्रसाद, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, वरूण धवन, गौरी शिंदे, आदी प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत.
 होमेज विभागात शशी कपूर, श्रीदेवी, विनोद खन्ना यांचे चित्रपट दाखवून श्रद्धांजली देण्यात येणार आहेत.
अंध मुलांसाठी विशेष स्क्रीनिंग व ऑडिओ वर्णनासह चित्रपट विशेष पॅकेजमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या विभागात ‘शोले’ आणि ‘हिचकी’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे अशी माहिती चैतन्य प्रसाद यांनी यावेळी दिली.
महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींच्या कार्डचे वितरण 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10  ते रात्री 10 वाजेपर्यंत  करण्यात येणार आहेत. प्रतिनिधी नोंदणीची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
 एसएजी मैदानावर पीपल्स फिल्म व्हिलेज  उभरले जाणार असून तेथे 21  ते  27 नोव्हेंबर पर्यंत चित्रपटांचे प्रदर्शन, मुलांसाठी कार्यक्रम, संगीत कार्यक्रम, सेलेब्रीटींच्या मुलाखती यासारखे कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी यावेळी दिली.
 आतापर्यंत 7291 प्रतिनिधींची नोंदणी झाली असून त्यातील 3918 यांनी प्रतिनिधी शुल्क भरले आहे. तसेच 945 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती तालक यांनी दिली.