पणजी:48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाचे चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले. इंडियन पॅनोरमा 2017 अंतर्गत 26 कथापट आणि 16 कथाबाह्य चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यावेळी इंडियन पॅनोरमा 2017 मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रथितयश आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना श्रीदेवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

इंडियन पॅनोरमाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात सर्वांसमवेत उपस्थित राहणे, हा माझा सन्मान असल्याची भावना श्रीदेवी यांनी व्यक्त केली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला हा एक उत्कंठावर्धक विभाग आहे. इंडियन पॅनोरमामध्ये विविध भागातल्या बहुभाषिक कथापट आणि कथाबाह्य चित्रपटांची सन्माननीय ज्युरींकडून विशेष निवड झाली आहे. इंडियन पॅनोरमा 2017चे अधिकृत उद्‌घाटन झाल्याचे जाहीर करायला आनंद वाटत असल्याचे त्या म्हणाल्या.

इंडियन पॅनोरमाच्या उद्‌घाटन समारंभात प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आनंदाचे असल्याचे इफ्फी महोत्सव संचालक सुनित टंडन यांनी सांगितले. हा महोत्सव इफ्फीचा अविभाज्य भाग असल्याचे ते म्हणाले. सर्वोत्कृष्ट कथापट आणि कथाबाह्य चित्रपटांना देश-विदेशात प्रोत्साहन देणे हा या मागचा हेतु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेली अनेक वर्ष इंडियन पॅनोरमाद्वारे सर्वोत्कृष्ट चित्रकृतींचे दर्शन घडत असून, या वर्षीही ही परंपरा अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोव्यात कालपासून सुरु झालेला 48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 28 तारखेपर्यंत रंगणार आहे.