दहशतवादी हाफिज सईद राजकारणात?

0
1079

नजरकैदेत असलेला दहशतवादी हाफिज सईद आता राजकारणात उतरणार आहे. हाफिजच्या जमात-उद-दावा या संघटनेने ‘मिल्ली मुस्लिम लीग’ नावाचा पक्ष स्थापन केला असून या पक्षाला मान्यता देण्यासाठी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्जही केला आहे. त्यामुळे हाफिज सईद राजकारणात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांना पनामा प्रकरणी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने पाकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात निवडणुका होणार की पुन्हा एकदा सैन्याच्या ताब्यात सत्ता जाणार याची पाकमध्ये जोरदार चर्चा सुरू असतानाच हाफिज सईदने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हाफिज सईदचे पाक लष्कर आणि आयएसआयशी चांगले संबंध आहेत. निवडणूक आयोगाने त्याच्या पक्षाला मान्यता दिल्यास लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानच्या राजकारणात पाय रोवण्यास त्याला मदतच होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.