सुप्रशासनासाठी भारत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणार-सुरेश प्रभू

0
1420

 

 

गोवा खबर:भारत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सुप्रशासन आणि योग्य नियमनासाठी करेल, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत यासंदर्भात आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. नागरिकांचा खासगीपणा आणि माहितीची मालकी जपण्यासाठी योग्य पावले उचलली जातील. अमेरिका आणि चीन यांचा एकत्रित जेवढा होत नाही त्यापेक्षा अधिक डेटाचे वहन भारत करत आहे, असे प्रभू यांनी सांगितले. जगातल्या अव्वल सहा कंपन्या या डेटाचा वापर करत आहेत.

या डिजिटल माहिती जगतासंदर्भात विधी यंत्रणा आणि नियामक आराखडा भारत अधिक बळकट करत आहे, असे प्रभू यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धीमत्ता हे आजचे तंत्रज्ञान असून जो यात प्रभूत्व संपादन करेल तो जगावर राज्य गाजवेल. प्रत्येक देश कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण विकसित करत असून व्यापक जनहितासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर व्हावा यासाठी भारतही यासंदर्भात धोरण विकसित करण्यासाठी काम करत आहे, अशी माहिती प्रभू यांनी दिली.

आज आणि उद्या दोन दिवस ही परिषद सुरू राहणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.